CoronaVirus News : लग्नसोहळ्यात दीडशे लोकांची उपस्थिती पडली महागात; ५० हजार दंड अन् एफआयआर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 06:49 PM2021-04-30T18:49:10+5:302021-04-30T18:51:23+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : लग्न सोहळ्यात सोशल डिस्टंसिंगचे तीनतेरा वाजत असून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून आले आहे.
मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईत कडक निर्बंध लागू करण्यात आली आहे. तरीही काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आहे. शुक्रवारी गिरगाव येथील बाबुलनाथ मंदिराजवळील संस्कृती हॉलमध्ये कोविड प्रतिबंध नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळा आयोजित करण्यात आल्याचे उजेडात आले. याची गंभीर दखल घेत महापालिकेने संबंधित सभागृहावर ५० हजार दंड ठोठावला आहे. तसेच संबंधितांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने २३ एप्रिलपासून राज्य सरकारने मुंबईत कडक निर्बंध लागू केले आहेत. लग्न सोहळ्यात सोशल डिस्टंसिंगचे तीनतेरा वाजत असून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नवीन नियमावलीत लग्न सोहळ्यात २५ पाहुणे उपस्थित राहू शकतात. तसेच विवाह सोहळ्यासाठी दोन तासांचा कालावधी देण्यात आला आहे. मात्र दादीसेठ मार्गालगत असणाऱ्या 'संस्कृती हॉल' मध्ये नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळा सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या डी विभाग कार्यालयाला शुक्रवारी मिळाली.
त्यानुसार विभाग कार्यालयाच्या चमूने त्या ठिकाणी धाड टाकली. तिथे विवाह कार्यक्रम सुरू असून सुमारे १५० व्यक्ती उपस्थित असल्याचे आढळून आले. तसेच तिथे ठिकाणी उपस्थित व्यक्तींमध्ये नियमानुसार आवश्यक असणारे सोशल डिस्टंसिंगदेखील राखण्यात आले नव्हते, असे दिसून आले. त्यामुळे संबंधित हॉल चालकांना ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. तसेच हॉलचालक व संबंधित लग्न सोहळ्याचे आयोजक यांच्याविरोधात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात एफ.आय.आर. दाखल करण्यात आली, अशी माहिती 'डी' विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.