CoronaVirus News: मुंबई पालिका आयुक्तांचे अन्य पालिकांना मार्गदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 07:31 AM2021-06-02T07:31:57+5:302021-06-02T07:32:51+5:30
कोरोना रोखण्यासाठी दाेन्ही वेळा मारली बाजी
मुंबई : वर्षभरापासून कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात मुंबई महापालिकेने दोन्ही वेळा बाजी मारली. धारावी पॅटर्न आणि मुंबई मॉडेलचे जगात कौतुक झाले. मुंबई मॉडेलचे अनुकरण अन्य शहरांनीही सुरू केले आहे. या सर्व उपाययोजनांची माहिती देण्यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी राज्यातील महापालिकांच्या आयुक्तांशी नुकताच ऑनलाइन संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.
पालिकेने काेराेना नियंत्रणासाठी राबविलेले विविध उपाय, नियोजन, अंमलबजावणीची सविस्तर माहिती आयुक्त चहल यांनी दिली. यावेळी राज्यातील विविध महापालिकांचे आयुक्त, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हे उपाय ठरले प्रभावी!
बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करून ‘पॉझिटिव्ह’ अहवाल पालिकेकडे निर्धारित वेळेत उपलब्ध करून घेतले. रजेनुसार रुग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्व २४ प्रशासकीय विभागांत ‘वॉर रूम’ कार्यान्वित करण्यात आल्या.
ऑक्सिजन खाटा, ऑक्सिजनचा पुरवठा, औषधांचा पुरवठा, बाधित रुग्णांच्या संपर्कातील रुग्णांचा शोध आदींवर भर देण्यात आला.
प्रत्येक वॉर्ड वॉर रूममध्ये डॉक्टर, कर्मचारी, सहाय्यक दिवसाचे २४ तास कार्यरत असतात.
रुग्णसंख्या शून्यावर आणण्यासाठी शीघ्रकृती कार्यक्रम राबवला. या प्रयत्नांना लोकप्रतिनिधींसह सामाजिक संस्थांचेही सहकार्यही लाभल्याचे आयुक्तांनी सांगितले.
डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधणे गरजेचे आहे. महापालिकेच्या स्तरावर कार्यरत प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र कार्यदायित्व सोपवणे गरजेचे असून, चांगल्या मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी एकच काम अनेक व्यक्तींना देणे कटाक्षाने टाळावे, असे आयुक्त चहल यांनी सांगितले.