CoronaVirus Mumbai News: मुंबईत ३ जम्बो कोविड रुग्णालयं सुरू होणार; आयसीयू सुविधा वाढवण्यावर विशेष भर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 11:37 AM2021-04-12T11:37:29+5:302021-04-12T11:38:21+5:30
CoronaVirus Mumbai News: कोरोना चाचणीचे अहवाल २४ तासांत द्या; मुंबई महापालिकेच्या लॅब्सना सूचना
मुंबई: शहरातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनं वैद्यकीय सुविधा उभारण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. येत्या ५ ते ६ आठवड्यांत शहरात ३ जम्बो कोविड रुग्णालयं उभारण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मानस असल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे. या प्रत्येक रुग्णालयात २ हजार बेड्स असतील. यासोबतच २०० आयसीयू आणि ७० टक्के ऑक्सिजन बेड्स असणार आहेत.
सध्याच्या घडीला मुंबईत दररोज ९ हजाराच्या आसपास कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. विशेष म्हणजे कोरोनाची लक्षणं दिसत नसताना अनेकांना कोरोनाची लागण होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांना योग्य वेळी उपचार मिळत नाहीत. परिस्थिती गंभीर झाल्यावर अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं समजतं. ही गोष्ट लक्षात घेऊन पालिकेनं शहरातील रुग्णालयांमध्ये ३२५ आयसीयू बेड्स वाढवले आहेत. त्यामुळे एकूण आयसीयू बेड्सचा आकडा २ हजार ४६६ वर पोहोचला आहे.
सध्याच्या घडीला शहरातल्या १४१ रुग्णालयांमध्ये १९ हजार १५१ आयसीयू डीसीएचसी/डीसीएच बेड्स आहेत. यापैकी ३ हजार ७७७ बेड्स सध्या रिक्त आहेत. पुढील ७ दिवसांमध्ये महापालिका डीसीएचसी/डीसीएच बेड्सची संख्या १ हजार १०० नं वाढवणार आहे. यामध्ये १२५ आयसीयू बेड्स असतील. शहरातील सर्व लॅब्सना २४ तासांत कोरोना चाचणीचे अहवाल देण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.