मुंबई : मुंबईतील रुग्णदुपटीचा सरासरी कालावधी आता ३६ दिवसांवर पोहोचला आहे. मात्र मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर आणि मुलुंड-भांडुप या परिसरात अद्याप रुग्णांची संख्या वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी महापालिकेने या विभागांमध्ये शीघ्र कृती कार्यक्रम आखला आहे. या अंतर्गत ‘मिशन झीरो’ म्हणजेच शून्य कोविड रुग्ण लक्ष्यांक गाठण्याचा निर्धार करण्यात आला आहे.पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी या उपक्रमाची माहिती अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या महत्त्वाकांक्षी उपक्रमात ५० फिरते दवाखाने (मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅन) विविध परिसरांमध्ये जाऊन प्राथमिक तपासणी व चाचणी करून बाधितांचा शोध घेणार आहेत. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावरील राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचा आरंभ आयुक्तांनी सोमवारी केला. या वेळी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, एमसीएचआय-क्रेडाई संघटनेचे अध्यक्ष नयन शाह, माजी अध्यक्ष धर्मेश जैन, उपाध्यक्ष नैनेश शाह तसेच देश अपनाये, बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन संस्थांचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.असे आहे मिशन झीरोमिशन झीरो अंतर्गत शून्य कोविड रुग्ण लक्ष्यांक गाठण्यासाठी डॉक्टर्स व औषधांसह ५० फिरत्या दवाखान्यांची वाहने मुलुंड, भांडुप, अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर या सर्व परिसरांमध्ये जाऊन रुग्णांची प्राथमिक तपासणी करून नागरिकांना औषधही देतील.दोन ते तीन आठवडे युद्धपातळीवर हे काम करून या भागातील रुग्णांची तपासणी नियमित केली जाणार आहे. यातूनच कोरोना संशयित रुग्णांना त्वरित वेगळे करून त्याच परिसरात त्यांची चाचणी (स्वॅब टेस्ट) केली जाणार आहे. बाधितांचा वेळीच शोध घेऊन उपचार करण्यावर यात भर असणार आहे. कोरोनाविषयीची माहिती पुरवून रुग्णांसह जनतेची काळजी घेणे, नागरिकांच्या मनामधील अवास्तव भीती कमी करणे तसेच दैनंदिन काम करण्यासाठी नागरिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी जागृती करण्यात येणार आहे.
CoronaVirus News : मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेचं ‘मिशन झीरो’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 6:46 AM