CoronaVirus News : कामगारांच्या हितातच व्यवसायाचे हित आहे : अझिम प्रेमजी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 12:51 AM2020-05-18T00:51:02+5:302020-05-18T00:51:35+5:30
कोविड-१९’मुळे देश संकटात सापडला असून अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर काही राज्यांनी कामगार कायदे रद्द वा शिथिल करण्याची भूमिका घेतली आहे.
मुंबई : कामगार कायदे रद्द अथवा शिथिल केल्याने संकटात असलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळणार नाही. कामगारांच्या हितातच व्यवसायाचे हित सामावले आहे, असे स्पष्ट मत ख्यातनाम उद्योगपती अझिम प्रेमजी यांनी व्यक्त केले आहे.
‘कोविड-१९’मुळे देश संकटात सापडला असून अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर काही राज्यांनी कामगार कायदे रद्द वा शिथिल करण्याची भूमिका घेतली आहे. ‘इकॉनॉमिक टाईम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात प्रेमजी यांनी राज्यांच्या या कृतीबाबत नाराजी व्यक्त केली. हा कामगारांवर अन्याय असून अलिखित सामाजिक कराराची ही क्रूर चेष्टा आहे. यामुळे मजूर मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करतील आणि त्यांचा तुटवडा निर्माण होईल. असे झाल्यास व्यवसाय संकटात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.
रेल्वे रुळांवर झोपलेल्या १६ मजुरांचा औरंगाबादजवळ मालगाडी खाली चिरडून मृत्यू झाला. या घटनेबाबत प्रेमजी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. समाजव्यवस्थेसाठी ही घटना अक्षम्य असल्याचे त्यांनी नमूद केले. लाखो लोक उपाशीपोटी पायी गावाकडे निघाले आहेत. कामगारांना सामाजिक सुरक्षितता आणि रोजगार कायम राहील, याची खात्री नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. संकटाच्या काळात कामगार कायदे रद्द करणे अन्यायकारक असल्याची टीका त्यांनी केली.
आपल्याला वाटते त्यापेक्षाही देशातील स्थिती भयंकर असल्याचे नमूद करून प्रेमजी म्हणाले, ‘‘गेल्या ५०-५५ दिवसांपासून आपला देश हा महामारीसोबत झुंजत आहे. अझिम प्रेमजी फाऊंडेशन आणि विप्रो यांच्या संयुक्त विद्यमाने ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील मिळून ३७५ जिल्ह्यांत अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. आमच्या संस्थेतील सुमारे १,६०० सहकारी, १० हजार सरकारी कर्मचारी आणि आमच्या विविध योजनांचा लाभ घेतलेले ५० हजार नागरिक यांच्या सहकार्यामुळे हे काम सुरू आहे. यात आमच्या विद्यापीठाच्या २ हजारांपेक्षा जास्त माजी विद्यार्थ्यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरली आहे. या सर्वांच्या योगदानामुळे देश संकटात असताना गरजूंना मदत करणे आमच्याकडून शक्य होत आहे.’’