मुंबई : केंद्र सरकारकडून ना गहू मिळाला, ना मजुरांच्या स्थलांतराचे पैसे. उलट, पीपीई किट आणि एन-९५ मास्कचे पैसेही केंद्र सरकार आता मागत आहे. शिवाय महाराष्ट्राचे हक्काचे ४२ हजार कोटी केंद्राकडे थकीत आहेत त्याचे काय, असा सवाल करीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी भाजपवर पलटवार केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र्राकडून राज्य सरकारला मोठ्या प्रमाणावर मदत केली जात असल्याचे सांगत विनाकारण केंद्र सरकारला बदनाम केले जात असल्याचा दावा मंगळवारी केला होता. काही आकडेवारीही सादर केली होती. फडणवीस यांचा दावा आघाडीच्या नेत्यांनी खोडून काढला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांची वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. उद्धव ठाकरे समर्थपणे कोरोनाविरोधात लढा देत असून, आघाडी एकसंघ आहे.
राहुल गांधी यांची मुख्यमंत्री ठाकरेंशी चर्चा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. राहुल गांधी यांनी स्वत:हून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून कोरोनाच्या लढ्यात काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आहे, असे आश्वस्त केले. च्महाराष्ट्रात आम्ही सत्तेत सहभागी आहोत. मात्र निर्णय प्रक्रियेत नाही, असे विधान खा. गांधी यांनी मंगळवारी केले होते. त्यावरून बराच राजकीय गदारोळ झाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर खा. गांधी यांनी रात्री टिष्ट्वट करून आपल्या विधानाची कशी मोडतोड केली गेली, आपण जे महाराष्ट्र सरकारविषयी चांगले मत व्यक्त केले होते ते कुठेही न दाखविता ठरावीक भाग उचलून राजकारण केले गेले, असा आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर बुधवारी सकाळी गांधी यांनी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला.