CoronaVirus News: पोकळ पॅकेज नको; काम केलेले चांगले; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 01:54 AM2020-05-25T01:54:37+5:302020-05-25T06:32:27+5:30
कोरोनाचा मुकाबला करण्यासंदर्भात महाविकास आघाडी सरकारला अपयश येत असल्याची टीका करीत भाजपने दोन दिवसांपूर्वी आंदोलन केले होते.
मुंबई : आधी बरेच पॅकेज देण्यात आले, उघडले तेव्हा रिकामा खोका निघाला. अशा पोकळ पॅकेजची जाहिरातबाजी करण्यापेक्षा कोरोनाचा मुकाबला करणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. विरोधकांनी राजकारण केलं तरी मी ते करणार नाही, तो माझा संस्कार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी विरोधकांना सुनावले.
कोरोनाचा मुकाबला करण्यासंदर्भात महाविकास आघाडी सरकारला अपयश येत असल्याची टीका करीत भाजपने दोन दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राप्रमाणे राज्यानेही पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी केली होती. ठाकरे यांनी राज्याला संबोधित करताना त्याचा समाचार घेतला.
मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्व जण प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. मात्र, काही जण राजकारण करीत आहेत. तुम्हाला हवं ते बोला. मात्र, मी राजकारण करणार नाही. माझ्यावर महाराष्ट्राचा विश्वास आणि जबाबदारी आहे, तसेच अडचणीच्या, संकटाच्या काळात राजकारण करण्याचे संस्कार आमचे नसून, महाराष्ट्राच्या संस्कृतीतही ते बसत नाही.
पॅकेज काय घोषित करायचं? जाहिरात करायची की मदत करायची? पोकळ घोषणा करणारं आमचं सरकार नाही. पॅकेज घोषित कशाला करायचं? त्यापेक्षा सरकारनं प्रत्यक्ष मदत करण्याचं काम केलं आहे. राज्य सरकारनं यापूर्वीच रेशन कार्ड नसणाऱ्यांनाही धान्य उपलब्ध करून दिलं, त्यांना तयार जेवणाची पाकिटं उपलब्ध करून दिली, स्थलांतरितांना घरी पोहोचविण्यासाठी ८० कोटी रुपयांचा खर्च करीत त्यांना रेल्वेनं घरी पोहोचविलं.
जूनमध्ये शाळा सुरू करण्याचे संकेत
जूनमध्ये शाळा आणि शेतीचा हंगाम सुरू होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबणार नाही. अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतही लवकरात लवकर निर्णय होईल, पालकांनी काळजी करू नये.
नमाज घरीच अदा करा
ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत, रमजान ईदची नमाज घरात राहूनच अदा करावी व जग कोरोनामुक्त होण्यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.