CoronaVirus News: कोरोनाच्या दृष्टीने येता महिना महत्त्वाचा; नवीन वर्षाचे स्वागत घरातच साधेपणाने करणे आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 12:00 AM2020-12-31T00:00:13+5:302020-12-31T00:00:20+5:30
नवीन वर्षाचे स्वागत घरातच साधेपणाने करणे आवश्यक
मुंबई : राज्यात सप्टेंबर महिन्यात पॉझिटिव्हिटी दर २४.६ टक्के होता, त्यात प्रत्येकी चौथा नमुना पॉझिटिव्ह असल्याचे निदान होत होते. मात्र, सध्या पॉझिटिव्हिटी दर ६.५ ते ७ टक्क्यांच्या दरम्यान आहे. मात्र, कोरोना संक्रमणाच्या दृष्टिकोनातून २६ डिसेंबर ते २६ जानेवारी हा काळ महत्त्वाचा असल्याचे मत राज्याच्या टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी व्यक्त केले.
टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, दिवाळीनंतर कोरोना रुग्णवाढीचा धोका होता, मात्र तो टळला. सध्या नवीन वर्षाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच ठिकाणी सामान्यांकडून कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्या दृष्टिकोनातून एक महिन्याचा कालावधी महत्त्वाचा आहे. नवीन वर्षाचे स्वागत घरातच साधेपणाने करणे आवश्यक आहे. शिवाय, पर्यटन करताना ज्येष्ठ नागरिक, गर्भवती आणि लहानग्यांच्या आरोग्याचा प्राधान्याने विचार व्हायला हवा.