CoronaVirus News: ‘संपूर्ण लॉकडाऊन’ मानवला!, महापालिकेचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 01:12 AM2020-06-27T01:12:47+5:302020-06-27T01:13:22+5:30
मात्र इमारती आणि सोसायट्यांचे चॅलेंज आता पोलीस व पालिकेसमोर असून त्याबाबत पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी या ठिकाणी भेट देत आढावा घेतला.
मुंबई : उत्तर मुंबईतील अनेक भागांत कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने त्या त्या विभागांत सध्या ‘संपूर्ण लॉकडाऊन’ घोषित करण्यात आला आहे. ज्यात मालाडचाही समावेश असून या ठिकाणच्या झोपडपट्टीत कोरोनाबधितांची संख्या बऱ्यापैकी रोडावली आहे. मात्र इमारती आणि सोसायट्यांचे चॅलेंज आता पोलीस व पालिकेसमोर असून त्याबाबत पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी या ठिकाणी भेट देत आढावा घेतला.
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मालाडच्या आप्पापाडा आणि गोरेगावच्या संतोषनगर परिसराची पाहणी केली. या ठिकाणी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. उत्तर मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन करताना निर्बंध कडक करण्याचे निर्देश मुंबई सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विनयकुमार चौबे यांनी उत्तर मुंबईचे अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांना दिले होते. त्यानुसार सर्वच कंटेनमेंट आणि रेड झोनमध्ये मेडिकल, किराणा तसेच दुधाची दुकाने वगळता सर्वच बंद करण्यात आले. लोकांचा वावरही टाळण्यात आला.
अत्यावश्यक काम असल्यास मास्क तसेच सुरक्षेच्या योग्य त्या उपाययोजना करून मगच संबंधित व्यक्तीला परवानगी देण्यात आली. या सगळ्यामुळे कुरार परिसरात ३२ रुग्णांची संख्या २ ते ३ वर आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांनी सांगितले. जे स्वत: नुकतेच कोरोनाशी दोन हात करीत कर्तव्यावर परतले आहेत.
दिंडोशी पोलिसांच्या हद्दीतील संतोषनगरमध्येही कोरोनाबधितांची संख्या कमी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता या दोन्ही परिसरात इमारती आणि सोसायट्यांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्याचे आव्हान पोलीस व पालिकेसमोर असणार आहे.
त्यानुसार पोलीस आयुक्तांनी या ठिकाणी निर्बंध कडक करण्याचे निर्देश दिल्याचे दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धरणेंद्र कांबळे यांनी सांगितले. या वेळी पालिकेच्या पी उत्तरचे सहायक आयुक्त संजोग कबरे, अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत तसेच पालिका व पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आयुक्तांनी यापूर्वी टोलनाक्यावर अशीच भेट देऊन बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले होते.
>कुरारमध्ये पत्रे उचकटायचे प्रकार सुरूच !
मालाडच्या कुरार परिसरात पालिकेने पत्रे लावून अनेक गल्ल्या तसेच रस्ते बंद केले आहेत. मात्र तरीही काही
खोडकर लोक पत्रे उचकटून बाहेर पडत असल्याचे प्रकार घडत आहेत. तसेच डबल सीट फिरणाºयांवरही कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.