मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या अशोक चव्हाणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती रविवारी समोर आली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण हे मुंबईतून नांदेडला गेले होते. तिथे त्यांनी कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर अशोक चव्हाण यांना उपचारासाठी नांदेडहून मुंबईला आणले असून त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपूर्वी ते मुंबईला आले होते. या निवडणुकीनंतर ते पुन्हा नांदेडला परतले. नांदेडला येऊन त्यांनी स्वत: होम क्वारंटाइन करून घेतलं होतं. त्यांनी कुटुंबापासून स्वत:ला वेगळं ठेवलं होतं. नांदेडमधील रुग्णालयात त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर ते उपचारासाठी आज नांदेडहून मुंबईकडे रवाना झाले होते.