मुंबई : कोरोनाच्या ‘ब्रेक द चेन’साठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मुंबई महानगरात सोशल डिस्टन्स पाळणे अवघड असले तरी कठोर निर्बंधांद्वारे कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला काही प्रमाणात यश येत असून, एप्रिलच्या सुरुवातीला ११ हजारांवर असलेली दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या आता निम्म्यावर आली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या साडेपाच हजारांवर आली आहे. सहकार्य मिळाले तर हाच ट्रेंड कायम राहील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
आपण सर्वजण गेले वर्षभर कोरोना विरोधातील लढाई लढत आहोत. दोन महिन्यांपासून आपल्या मदतीला लसही आली. त्यानंतर मुंबईकरांचा निष्काळजीपणा काहीसा वाढला आणि त्याचे दुष्परिणाम गेल्या दीड ते दाेन महिन्यांत दैनंदिन काेराेना रुग्णवाढीच्या रुपात पहायला मिळाले. रुग्णसंख्या पूर्वीपेक्षा तिप्पट झाली होती. मात्र आता हा आलेख पुन्हा खाली येत आहे. राज्य सरकारच्या मदतीने पालिका अथक परिश्रम घेत आहे. मुंबईकरांचे सक्रिय सहकार्य, जास्तीत जास्त स्वयंशिस्तीची गरज असून मुंबईकर ती नक्कीच पाळतील, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला.
चाचणी, विलगीकरण, त्वरित उपचारांवर भर
१० फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आली आहे. असे असले तरी दैनंदिन रुग्णांमध्ये सुमारे ८५ टक्के हे लक्षणविरहित रुग्ण आहेत.nमागील वर्षभरात ४१ लाख ७४ हजार २५९ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. तपासणी, चाचणी, विलगीकरण, त्वरित उपचारांवर भर देण्यात आला. ५३ लाख ५२ हजार ५२१ बाधितांचे विलगीकरण करण्यात आले.
महापालिकेने दररोज १ लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. आतापर्यंत मुंबईत सुमारे १२ लाख ६० हजार ३८७ हून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. सुमारे ३५ लाख मुंबईकर नागरिकांच्या कुटुंबाच्या घरी जाऊन तपासणीसह कोराेना विरोधातील लढाईबाबत जागृती आणि माहिती गोळा करण्यात आली.