CoronaVirus News : सायन रुग्णालयातील ९९ डॉक्टरांना कोरोना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 03:48 AM2020-06-21T03:48:04+5:302020-06-21T03:48:23+5:30
कोरोनाबाधित डॉक्टरांपैकी ६० जणांची प्रकृती सुधारत असून, फक्त ३० डॉक्टरांवर उपचार सुरू आहेत.
मुंबई : सायन येथील मुंबईपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातील ९२ निवासी आणि ७ शिकावू डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. शिवाय रुग्णालयातील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी, परिचारिका असे १९० हून अधिक कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात आहेत. कोरोनाबाधित डॉक्टरांपैकी ६० जणांची प्रकृती सुधारत असून, फक्त ३० डॉक्टरांवर उपचार सुरू आहेत. लागण झालेले अन्य कर्मचारी, परिचारिकांवर उपचार सुरू असून, कुणीही गंभीर नसल्याचे सांगण्यात येते.
रुग्णालय शस्त्रक्रिया विभागात काम करणारे नरेश लोखंडे या ३५ वर्षांच्या वैद्यकीय कर्मचाऱ्याचे कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर, दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचेही करोनामुळेच निधन झाले होते. सध्या वॉर्ड क्रमांक ७ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर उपचारांसाठी राखीव आहे. निवासी डॉक्टरांमधील संसर्ग वाढू नये, म्हणून लोकमान्य टिळक रुग्णालयातील वसतिगृहाव्यतिरिक्त काही निवासी डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था दादरमधील हॉटेलमध्ये केली आहे. जेणेकरून एकाच खोलीत ३ ते ४ जण राहिल्यामुळे होणारी गर्दी किंवा संसर्ग टाळता येईल.