CoronaVirus News : मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये आले कोरोनावर नियंत्रण, महापालिकेला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 01:23 AM2020-06-21T01:23:50+5:302020-06-21T01:24:02+5:30
CoronaVirus News : गोवंडी, कुर्ला, गोरेगाव, अंधेरीमधील झोपडपट्ट्यांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी झोपडपट्ट्यांमध्ये प्रसार सुरू झाला.
मुंबई : सोशल डिस्टन्स पाळणे अवघड असल्याने मुंबईतील दाटीवाटीने वसलेल्या वस्त्यांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखणे महापालिकेपुढे मोठे आव्हान ठरले होते. मात्र गेला महिनाभर सुरू असलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे आशिया खंडातील मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीप्रमाणेच आता मुंबईतील अन्य झोपडपट्ट्यांमध्येही कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येऊ लागला आहे. यामध्ये गोवंडी, कुर्ला, गोरेगाव, अंधेरीमधील झोपडपट्ट्यांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी झोपडपट्ट्यांमध्ये प्रसार सुरू झाला.
मात्र एका खोलीत दहा लोकांचे वास्तव्य, सार्वजनिक शौचालयांचा वापर होत असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखणे अवघड होत गेले. त्यामुळे काही दिवसांमध्येच वरळी, धारावी, कुर्ला, चेंबूर, गोवंडी, वांद्रे, गोरेगाव, दहिसर येथील मोठ्या झोपडपट्ट्यांमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढत गेली. यावर जास्तीतजास्त लोकांची तपासणी, संशयित रुग्णांसाठी संस्थात्मक विलगीकरण, तत्काळ निदान व चांगले उपचार आणि बाधित क्षेत्राची प्रभावी अंमलबजावणी यामुळे धारावीसारख्या मोठ्या झोपडपट्टीत आता रुग्णसंख्या ४५ दिवसांनी दुप्पट होत आहे. धारावीतील उपाययोजनांवर अंमल करीत अन्य विभागांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश मिळविले आहे. झोपडपट्टीचे प्रमाण अधिक असलेल्या एल विभाग म्हणजे कुर्ला परिसरात कुरेशी नगर, कसाई वाडा, अंबिका नगर येथे बाधित रुग्णांचा आकडा शंभरवर पोहोचला होता. त्यामुळे कुर्ला परिसरात रुग्ण दुप्पट होण्यासाठी आता ५५ दिवसांचा कालावधी लागत आहे. गोरेगाव येथे भागात सिंग नगर, लक्ष्मी नगर आणि इंदिरा नगर येथे रुग्णसंख्या वाढली होती. त्यामुळे जास्तीतजास्त लोकांची तपासणी आणि संशयित रुग्णांचे विलगीकरण यावर भर देण्यात आले.
कोरोनावर मात करण्यासाठी या सूत्राचे पालन गोवंडी, अंधेरीत नेहरू नगर, दहिसर येथील गणपत पाटील नगर अशा झोपडपट्ट्यांमध्येही करण्यात आले.
>असे मिळवले झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनावर नियंत्रण
बाधित क्षेत्रांमध्ये जास्तीतजास्त लोकांची तपासणी, संशयित रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरण, पॉझिटिव्ह रुग्णांवर तत्काळ उपचार तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
प्रतिबंधित केलेल्या विभागांमध्ये नागरिकांना सर्व नागरी सुविधा, औषध व अत्यावश्यक सेवा पुरविण्यात आल्या. धान्यांची जेवणाची पाकिटे, दैनंदिन गरजा भागविल्या.खाजगी दवाखान्यांच्या माध्यमातून बाधित क्षेत्रातील जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचणे. त्याचबरोबर झोपडपट्ट्यांमधील लोकांकडून सहकार्य मिळविण्यासाठी स्थानिक नेते व सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेण्यात आली.
झोपडपट्ट्यांमध्ये सार्वजनिक शौचालयांचा वापर होत असल्याने संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे सार्वजनिक शौचालयांमध्ये दररोज तीन पाळीत निर्जंतुकीकरण केले जाते.
>विभाग रुग्णसंख्या डिस्चार्ज रुग्णवाढ कालावधी
(दिवसांत)
एच पूव खार, वांद्रे ३१२९ २२५९ ७२
ई भायखळा ३३८५ १८४२ ६५
जी उत्तर धारावी ४३४२ २४२६ ४५
एल कुर्ला ३७८१ २५७७ ५५
एम पूर्व गोवंडी, मानखुर्द २८४२ १४७३ ५७