मुंबई : कोरोना रुग्णांना तात्काळ उपचार मिळण्यासाठी महापालिकेने गेल्यावर्षी जंबो कोविड केंद्र, कोरोना काळजी केंद्र उभारली. तर लॉकडाऊन काळात प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अन्नपुरवठा, औषधपुरवठा आदींसाठी तब्बल १६०० कोटींहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे. पुन्हा रुग्णांची संख्या वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता भासत आहे. या खर्चाचा भार महापालिकेच्या तिजोरीवर पडत आहे. देशातील श्रीमंत महापालिका असल्याने मुंबई महापालिकेने कोविड काळातील सर्व आर्थिक भार पेलला आहे. हा खर्च वाढत आता दोन हजार कोटींवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी या आकस्मिक खर्चासाठी महापालिकेने राखीव निधी वापरला होता. काही वैद्यकीय उपकरण, मास्क, ग्लोव्हज, थर्मामीटर, सॅनिटायझर असे काही आवश्यक साहित्य खाजगी सामाजिक बांधिलकी (सी एस आर) फंडातून मिळवण्यात आले आहेत. कोविड केंद्रांची उभारणी व औषधांसाठी सुरुवातीच्या काळात राज्य सरकारकडून महापालिकेला जेमतेम ८० कोटींचा निधी मिळाला. त्यानंतर कोणताही निधी अद्याप आलेला नाही, असे पालिकेतील वरिष्ठ सूत्रांकडून समजते. निधीचा वाढता भार....महापालिकेने गेल्या वर्षी आकस्मिक निधीतून रक्कम वापरत कोविडचा खर्च भागवला होता. देशातील श्रीमंत महापालिका असली तरी कोरोनाच्या वाढत्या खर्चाने पालिकेचे आर्थिक गणित बिघडवले आहे. १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यामुळे सध्या निधीची कमतरता नाही. कोरोना काळात आवश्यक खर्चांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सध्यातरी निधी कमी पडत नाही. - सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त
CoronaVirus News: कोरोना खर्चाचा मुंबई महापालिकेवर वाढला भार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 2:09 AM