CoronaVirus News: मुंबईत कोरोना मृत्यूंमध्ये २४ टक्क्यांनी घट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 06:47 AM2021-08-09T06:47:53+5:302021-08-09T06:48:11+5:30
जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून मृतांच्या संख्येतही घट होऊन प्रतिदिन मृत्यू होणाऱ्यांची संख्या १०पेक्षा कमी झाली आहे.
मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णसंख्येसह मृत्यूचे प्रमाणही कमी झाले असून, शहरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत मृतांच्या संख्येत सुमारे २४ टक्क्यांनी घट झाली आहे. शहरात प्रतिदिन रुग्णसंख्या ५००पेक्षा कमी झाली तरीही मृतांची संख्या मात्र दहापेक्षा अधिक होती. परंतु, जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून मृतांच्या संख्येतही घट होऊन प्रतिदिन मृत्यू होणाऱ्यांची संख्या १०पेक्षा कमी झाली आहे.
मुंबईत १८ ते २४ जुलै या आठवड्यात २,८२१ रुग्णांचे नव्याने निदान झाले असून, ७६ मृत्यू झाले. याच्या आधीच्या म्हणजे ११ ते १७ जुलै या आठवड्याच्या तुलनेत रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी मृतांची संख्या दोनने कमी झाली. तर २५ ते ३१ जुलै या काळात रुग्णसंख्या २,३३७ पर्यंत कमी झाली, तर मृतांची संख्या ५८ वर आली आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात रुग्ण संख्येत १७ टक्के व मृतांच्या संख्येत सुमारे २४ टक्क्यांनी घट झाली आहे. मुंबईत ४,१९६ सक्रिय रुग्ण आहेत, त्यातील ४७२ रुग्ण गंभीर आहेत. १,४४० रुग्ण लक्षणविरहीत आहेत, तर २,२८४ रुग्णांत सौम्य व मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. लक्षणविरहीत रुग्णांचे प्रमाण ३४ टक्के तर लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण ५५ टक्के आहे, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली.