CoronaVirus News : कोरोना महामारी; धारावी पॅटर्न ठरला जगात भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 03:36 AM2020-07-12T03:36:05+5:302020-07-12T06:27:21+5:30

जागतिक आरोग्य संघटनेकडून पालिकेने केलेल्या उपाययोजनांचे कौतुक

CoronaVirus News: Corona epidemic; The Dharavi pattern became the heaviest in the world | CoronaVirus News : कोरोना महामारी; धारावी पॅटर्न ठरला जगात भारी

CoronaVirus News : कोरोना महामारी; धारावी पॅटर्न ठरला जगात भारी

Next

मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने केलेल्या उपाययोजनांचे कौतुक थेट जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केले आहे. कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर मुंबईतील प्रमुख हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आता केवळ १२२ सक्रिय रुग्ण आहेत, तर २००२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. संशयितांचा शोध, चाचणी, विलगीकरण आणि योग्य उपचारामुळे धारावीमध्ये संसर्गाची साखळी तोडण्यात पालिकेला यश आले, असा गौरव डब्ल्यूएचओने केला आहे.
अडीच चौरस किमीमध्ये वसलेल्या धारावीत तब्बल साडेआठ लाख लोकवस्ती आहे. दाटीवाटीने वसलेल्या या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर फिजिकल डिस्टन्स पाळणे अवघड ठरत होते. त्यामुळे रुग्ण झपाट्याने वाढत गेले. या झोपडपट्टीतील ८० टक्के रहिवासी सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात. दहा बाय दहाच्या खोलीत आठ ते दहा लोक राहत असल्यामुळे संसर्गाचा धोका आणखी वाढला. रोज ७०-८० रुग्णांची नोंद होऊ लागली. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ‘मिशन धारावी’ मोहीम राबवण्यात आली. फिव्हर क्लिनिकद्वारे तपासणी सुरू झाली.
पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या ‘चेसिंग दी व्हायरस’ मोहिमेने प्रभाव दाखवला. फिजिकल डिस्टन्स शक्य नसल्याने संस्थात्मक विलगीकरण केले. तब्बल ३.६ लाख नागरिकांची यात ८,२४६ ज्येष्ठ नागरिकांचीही तपासणी करण्यात आली. शिवाय मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून १४,९७० जणांची तपासणी केली. सोबतच गरजेनुसार बाधितांवर आवश्यक औषधोपचार करण्यात आले. त्यामुळे धारावीत आता रुग्णांची संख्या तब्बल १४१ दिवसांनंतर दुप्पट होत आहे.

संपूर्ण देशासाठी दिशादर्शक
कोरोनाच्या लढाईत धारावीचे रोल मॉडेल संपूर्ण देशाला दिशादर्शक ठरणार आहे. स्वयंशिस्त आणि सामूहिक प्रयत्नातून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणता येऊ शकतो, हे यामुळे जगासमोर आले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

असे केले कौतुक
न्यूझीलंड, व्हिएतनाम, इटली, स्पेन, कोलंबिया, थायलंड या देशांसह मुंबईतील दाटीवाटीच्या धारावीनेही उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध काम करीत कोरोना थोपवता येऊ शकतो, हे दाखवून दिले. जगभरात गेल्या सहा आठवड्यांत दुपटीहून अधिक रुग्ण वाढले आहेत. कोरोनाचा उद्रेक झाला असला तरी योग्य नियोजनाने तो थोपवला जाऊ शकतो, हे दाखवून देणाऱ्या देशांमध्ये धारावीचे उदाहरणही असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रॉस ग्रेब्रेसस यांनी म्हटले आहे.

Web Title: CoronaVirus News: Corona epidemic; The Dharavi pattern became the heaviest in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.