CoronaVirus News: कोरोना वाढतोय, साहित्य संमेलनाचा अट्ट्हास कशाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 12:34 AM2021-02-23T00:34:42+5:302021-02-23T00:34:48+5:30

साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे.

CoronaVirus News: Corona is growing, why the fuss of the literary convention? | CoronaVirus News: कोरोना वाढतोय, साहित्य संमेलनाचा अट्ट्हास कशाला?

CoronaVirus News: कोरोना वाढतोय, साहित्य संमेलनाचा अट्ट्हास कशाला?

Next

दुर्गेश सोनार

मुंबई : राज्यभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नाशकात मार्च अखेरीस होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कसे होणार यावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. कोरोनाचा उद्रेक पाहता संमेलनाचा अट्टाहास कशासाठी, असा सवाल साहित्य वर्तुळातून आता केला जात आहे. तर १५ दिवस वाट पाहून संमेलन आयोजनाचा निर्णय घेऊ मात्र, ऑनलाइन माध्यमातून संमेलन कदापि होणार नाही, अशी भूमिका साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी घेतली आहे.      

साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे एकूणच संमेलनाच्या आयोजनावर कोरोनाचे सावट आहे. अशा स्थितीत आढावा घेऊन संमेलन आयोजनाचा फेरविचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  दरवर्षी होणारे साहित्य संमेलन हा साहित्यातील मोठा उत्सव मानला जातो. या माध्यमातून साहित्यिक, प्रकाशक,  रसिक, ग्रंथविक्रेते यांची मांदियाळी एकत्र येत असते. साहित्यिक-रसिकांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी होतात. मात्र, सध्याची  परिस्थिती लक्षात घेता नियोजित संमेलन पुढे ढकलणेच योग्य ठरेल, असे बोलले जात आहे.

कोरोनाचे संकट टळले तर संमेलन होणारच. पण जर प्रादुर्भाव वाढत गेला, सरकारने निर्बंध कडक केले तर स्वागताध्यक्ष भुजबळ आणि साहित्य महामंडळ निर्णय घेईल. सध्या तरी ‘वेट ॲन्ड वॉच’ अशीच महामंडळाची भूमिका आहे.     - कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ 

आयोजकांनी ठरवावे सध्या संमेलन घ्यावे की घेऊ नये,  हे साहित्य महामंडळानेच ठरवायचे आहे. त्यांनाच ठरवूही द्यावे. तशीही काही असाधारण परिस्थिती उद्भवली तर तातडीची उपाययोजना करण्याचे सर्व अधिकार महामंडळास आहेतच. 
- श्रीपाद भालचंद्र जोशी, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ 

याेग्य काळजी घेऊ
संमेलनात सतत सॅनिटायझिंग केले जाईल.  सहभागी होणाऱ्यांची कोविड चाचणी केली जाईल. संमेलन होत असताना कोरोनाविषयक संपूर्ण काळजी घेतली जाईल.   - डॉ. शंकर बोऱ्हाडे, कार्यवाह, अ. भा. मराठी साहित्य संमेलन

संमेलनात निकष पाळताना प्रत्येक वेळी सॅनिटाइझ करणार का, येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी करणार का, इतक्या लोकांची निवासाची व्यवस्था कशी करणार, असे अनेक प्रश्न आहेत. या पार्श्वभूमीवर संमेलन पुढे ढकलणं हा पर्याय असू शकतो.   
- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे  

हे संमेलन होऊ नये. शासनाने दिलेला निधी आणि संयोजक संस्थेने जमवलेला निधी पुढच्या संमेलनासाठी राखीव ठेवावा. महामंडळाने तातडीने बैठक घेऊन संमेलन पुढे ढकलावे.  - डॉ. महेश केळुसकर, ज्येष्ठ कवी 

Web Title: CoronaVirus News: Corona is growing, why the fuss of the literary convention?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.