CoronaVirus News: सिद्धिविनायकालाही कोरोनाचा फटका, लॉकडाऊनमुळे आर्थिक विघ्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 04:52 AM2020-07-16T04:52:33+5:302020-07-16T06:33:58+5:30
सूत्रांकडील माहितीनुसार, मंदिराचे सरासरी वार्षिक उत्पन्न सुमारे ९६ कोटी रुपयांच्या आसपास आहे. गेल्या साडेतीन महिन्यांचा विचार करता जून महिन्यातील पहिले पंधरा दिवस वगळावे लागतील.
मुंबई : लॉकडाऊनमुळे प्रभादेवीचे सिद्धिविनायक मंदिर गेले साडेतीन महिने भाविकांसाठी बंद आहे. त्याचा परिणाम मंदिराच्या गंगाजळीवर झाला आहे. विश्वसनीय सूत्रांच्या महितीनुसार, मंदिराच्या दानपेटीत आणि अन्य धार्मिक कार्यांसाठी दररोज सरासरी लाखो रुपये जमा होत होते. ते पाहता साडेतीन महिन्यांत सुमारे १८ कोटींचे उत्पन्न बुडाल्याचा अंदाज आहे.
सूत्रांकडील माहितीनुसार, मंदिराचे सरासरी वार्षिक उत्पन्न सुमारे ९६ कोटी रुपयांच्या आसपास आहे. गेल्या साडेतीन महिन्यांचा विचार करता जून महिन्यातील पहिले पंधरा दिवस वगळावे लागतील. कारण जसजसा पाऊस सुरू होतो; तेव्हा सुरुवातीच्या काळात मंदिरातील भाविकांची गर्दी कमी होते. हा विचार करता जून महिन्याचे सुरुवातीचे पहिले पंधरा दिवस जरी वगळले तरी लॉकडाऊनचे एप्रिल, मे आणि जून हे तीन महिने आणि जुलै महिन्याचे पाहिले १५ दिवस धरले असता; तीन महिन्यांत १८ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. एका महिन्याला दानपेटीतील ३ कोटी आणि प्रसादासह उर्वरित धार्मिक कार्यातून ३ कोटी असे ६ कोटींचे उत्पन्न मिळते. महिन्याकाठी ६ कोटी म्हटले तरी ३ महिन्यांचे १८ कोटी होतात. सरासरी विचारात घेतली तर हा आकडा १५ ते १८ कोटी रुपयांच्या आसपास पोहोचतो.
सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने मात्र याबाबत काहीच बोलण्यास नकार दिला आहे. हा विषय पूर्णत: अकाउंट डिपार्टमेंटशी संबंधित असून, सध्या आम्ही माहिती देऊ शकत नसल्याचे सांगत मंदिर प्रशासनाने अधिकृत माहिती दिली नाही. सद्य:स्थितीत सिद्धिविनायकाचे आॅनलाइन दर्शन आणि आरती भाविकांना मोफत करता येत आहे; तर पूजेसाठी मात्र पैसे भरावे लागत आहेत. मात्र मंदिर बंद असल्याने साहजिकच उत्पन्नावर परिणाम झाला आहे. याबाबत ट्रस्टने सांगितले की, ही वेळ उत्पन्न पाहण्याची नाही. मंदिराकडून मदतीचे काम अव्याहत सुरूच आहे. रुग्णांना आॅनलाइन वैद्यकीय मदत केली जाते. पुस्तक पेढी सुरू आहे. हिवरे गावाला पाच कोटींचा धनादेश दिला आहे. मुख्यमंत्री निधीला मदत केली. अन्य सामाजिक कामे सुरूच आहेत.
२५ वर्षांनंतर दुरुस्ती
सिद्धिविनायक मंदिराच्या दुरुस्तीचे काम वर्षअखेरीस हाती घेतले जाणार आहे. त्या वेळी साहजिकच मंदिर बंद ठेवण्यात येईल. सुमारे २५ वर्षांपूर्वी मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली होती. त्यानंतर आता मंदिराची दुरुस्ती करण्यात येत आहे.