मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक असली तरी इथल्या रुग्णांचा मृत्यूदर हा पश्चिम बंगाल (८.४०), गुजरात (५.९९) आणि मध्य प्रदेश (४.५१) या राज्यांपेक्षा कमी आहे. जगात बाधितांचा मृत्यूदर ६.६१ टक्के असताना महाराष्ट्रात मात्र तो ३.४९ इतका आहे.कोरोनाबाधितांच्या संख्येने शुक्रवारी नवा उच्चांक गाठला. दिवसभरात २ हजार ९४० नव्या रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे, तर एका दिवसात ८५७ लोक बरे झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या १२ हजार ५८३ इतकी झाली आहे. दिवसभरात कोरोनामुळे ६३ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण मृतांची संख्या १ हजार ५१७ इतकी झाली आहे.देशातील ३३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी १० ठिकाणी एकाही मृत्यूची नोंद नाही, तर ८ ठिकाणी मृतांची संख्या १० पेक्षा कमी आहे. त्यामुळे देशातील मृत्यूदर ३.०२ इतका आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडील माहितीचे संकलन करून सरकारने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती हाती आली आहे. २२ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत राज्यातील रुग्णसंख्या ४१ हजार ४६२ तर मृतांची संख्या १४५४ इतकी होती. बाधितांपैकी १० हजार २८७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील बाधितांमध्ये तरुणांची संख्या जास्त असल्याची माहितीसुद्धा या अहवालातून हाती आली आहे. ३० ते ४० या वयोगटात सर्वाधिक ८३९४ रुग्ण आहेत. त्याखालोखाल २१ ते ३० (८२५२), ४१ ते ५० (६९५२), ५१ ते ६० (६१८४) या वयोगटातील रुग्ण आहेत. ६१ ते १०० या वयोगटामध्ये १५७१ रुग्ण आहेत, तर शंभरी ओलांडलेल्या एका रुग्णावरही उपचार सुरू आहेत. दहा वर्षांपर्यंतच्या १४१३ मुलांनाही कोरोनाने गाठले असून २७६१ रुग्ण ११ ते २० वयोगटातले आहेत. बाधितांमध्ये पुरुषांची संख्या ६२ आणि महिलांची संख्या ३८ टक्के आहे. मृतांमध्ये हा टक्का अनुक्रमे ६२ आणि ३७ आहे. राज्यातील एकूण तपासण्यांपैकी ८६ टक्के चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. देशातील बळींशी (४४६७) तुलना केल्यास महाराष्ट्राची टक्केवारी सर्वाधिक ३२ टक्के आहे. रुग्णसंख्येत महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू (१३९६७), गुजरात (१२९०५), दिल्ली (११६५९) या राज्यांचा क्रमांक लागतो. या तिन्ही राज्यांत अनुक्रमे ९४, ७७३, १९४ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशातील मृतांची संख्या अनुक्रमे २५९ आणि २७० इतकी आहे.राज्यासमोरील आव्हान वाढलेपावसाळ्यापूर्वी कोरोना संकट संपवायचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शनिवारी जनतेशी संवाद साधताना नमूद केले होते. मात्र, सोमवारपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू झाल्यानंतर पहिल्या पाच दिवसांत राज्यात ११ हजार १०२ रुग्ण आढळले असून ३३५ जणांचा मृत्यू झाला आहे. याच दिवसांत प्रतिदिन रुग्णसंख्या दोन हजारांच्या पुढे तर मृतांच्या संख्येने ६० चा आकडा ओलांडला आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणाचे राज्यासमोरील आव्हान वाढले आहे. याच पाच दिवसांत देशातील रुग्णसंख्येचे आकडेसुद्धा आजवरचे सर्वाधिक आहेत.
मुंबई, पुण्याचा धोका कायममुंबई महानगर क्षेत्रातील ९ महापालिकांच्या हद्दीतल्या रुग्णांची संख्या ५ हजार १८४ असून त्यापैकी ४७०२ रुग्ण मुंबई शहरातले आहेत, तर पुणे महापालिका हद्दीतल्या रुग्णांची संख्यासुद्धा १७६३ वर पोहोचली आहे. त्याखालोखाल मालेगाव (४२५), औरंगाबाद (४११) या शहरांचा क्रमांक असून सुदैवाने राज्याच्या ग्रामीण भागांतील रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. मृतांमध्ये मुंबई (८८२) पाठोपाठ पुणे (२२२), मालेगाव (४३), औरंगाबाद (३९) आणि ठाणे (३३) या शहरांचा क्रमांक आहे.लॉकडाउनमुळे रुग्णसंख्या, मृत्यू कमीवेळेत लॉकडाऊन लागू झाल्याने देशातील सुमारे २० लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली नाही आणि मृतांची संख्या आटोक्यात राहिली. लॉकडाऊन नसता तर कोरोनाने 37-78,000 बळी घेतले असते, असे देशाच्या कोविड 19 एम्पॉवर्ड ग्रुपचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले. मात्र २४ तासांत देशात ६०८८ नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या1,24,076 वर गेली आहे.21,15,776रुग्ण जगात झाले बरेजगभरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता २१ लाख १५ हजारांवर पोहोचली आहे. जगातील एकूण रुग्णसंख्या ५२ लाख ४३ हजारांवर पोहोचली असून, मृतांची संख्या 3,35,888 पोहोचली आहे. चीनमधील लोक घराबाहेर पडत असतानाच शुक्रवारी त्या देशात ३९ नवे रुग्ण आढळले आहेत.