मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी काही खासगी रुग्णालयांत खाटा अडवल्या आहेत. खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी येत असल्याने पालिकेने वॉर्ड वॉर रूम आणि जम्बो रुग्णालयातील खाटांच्या नियोजनासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार रात्री ११ ते ७ या वेळेत रुग्णांना तातडीने खाट उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असेल.सध्या १९ हजार खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव असून पैकी ३,७७७ रिकाम्या आहेत. तरीही काहीवेळा खाटांसाठी वणवण करावी लागल्याची तक्रार रुग्ण, नातेवाइकांकडून येत असते. यासाठी मुंबईतील २४ विभाग कार्यालयातील वॉर रूम, सात जम्बो रुग्णालयांमध्ये खाटांचे वाटप करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
७० टक्के ऑक्सिजन खाटायेत्या पाच ते सहा आठवड्यांत राज्य शासनामार्फत मुंबईत प्रत्येकी एक असे तीन जम्बो फील्ड रुग्णालय उभारण्यात येतील. प्रत्येक रुग्णालयात दोन हजार खाटांची क्षमता असेल. तसेच दोनशे आयसीयू खाटा तर ७०% ऑक्सिजन खाटा असतील
हॉटेल हाेणार कोरोना केंद्रात मुंबईतील काही चतुर्थ श्रेणी व पंचतारांकित हॉटेल्सचे रूपांतर कोविड काळजी केंद्र २ मध्ये रूपांतर करण्याचे प्रयत्न पालिकेकडून सुरू आहेत.
अशी करून देणार व्यवस्था : रुग्णांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यास त्यांना तातडीने उपचाराची गरज असते. मात्र, अनेकदा खाट मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होतात. अशावेळी विशेषत: रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत रुग्णांना लवकरात लवकर रुग्णालयात खाट मिळवून देण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असेल. दुपारी ३ ते रात्री ११ आणि रात्री ११ ते सकाळी ७ अशा दोन पाळ्यांमध्ये हे अधिकारी काम करतील. ते एकमेकांच्या संपर्कात राहून गरजू रुग्णांच्या खाटांची व्यवस्था करतील. प्रत्येक कॉल संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून आवश्यक असणारे ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटरची खाट त्यांच्यामार्फतच देण्यात येईल, असे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले.
२४ तासांत कोविड अहवाल!पॉझिटिव्ह अहवाल वेळेत आल्यास संबंधित रुग्णाला आवश्यकतेनुसार खाट उपलब्ध करून देणे पालिकेला शक्य होईल. त्यामुळे पालिका किंवा खासगी लॅबमध्ये स्वॅब घेतल्यानंतर ‘आरटी-पीसीआर’ चाचणीचा अहवाल २४ तासांतच द्यावा, असे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी संबंधितांना दिले.