मुंबई- कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजवला असून, भारतालाही त्यांचा मोठा फटका बसला आहे. भारतातल्या महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. राज्यातल्या वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला थोपवण्यासाठी ठाकरे सरकारही प्रयत्नशील आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी झी 24 तासला एक मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत त्यांनी कोरोनासंदर्भातील अनेक शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना टेस्टचा दर हा जास्त का आहे?, असं त्यांना विचारलं असता ते म्हणाले, खर्च जास्त असल्याचं मान्य आहे, पण जर टेस्ट करणाऱ्या लॅबची संख्या वाढवली तर दर कमी होईल, पुढील काही दिवसांत हा दर 2500 रुपये एवढा खाली येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, कोरोना आजाराच्या एका टोकाच्या जवळ आपण होतो. आता आपण आणखी पुढे सरकलो आहोत. मात्र बरे होण्याचे प्रमाणही मोठं आहे हेसुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे.सरकारी रुग्णालयात बेडस् वाढवले आहेत. खासगी रुग्णालयात जागा वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जेजेच्या प्रांगणात सिमेंट काँक्रिट जागेच्या ठिकाणी 500 बेडचे आयसीयू तयार करण्याचा प्लॅन आहे. मुंबईत रिएल टाइम डॅशबोर्ड तयार करण्याचे काम पूर्णत्वास जात आहे. आलेलं संकट मोठं आहे तेव्हा थोडी त्रेधातिरपीट उडत आहे हे खरं असल्याचंही त्यांनी मान्य केलं. चार औषधांची मागणी आम्ही टास्क फोर्सने सरकारकडे केली आहे. काही उपलब्ध आहेत, काही अत्यंत कमी स्वरूपात. याचा पाठपुरावा चालू आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये अव्वाच्या सव्वा बिलं आकारली जात असल्यावर त्यांनी सांगितलं की, यासंदर्भात मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या बैठकीत ही बिलंसुद्धा चर्चिली गेली. यापुढे खासगी रुग्णालयात ८० टक्के बेडस् या कोविड आणि नॉन-कोविड यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला, याचा दर हा सरकारी असेल. २० टक्के बेडस् हे खासगी रुग्णालयाच्या ताब्यात असतील, त्याचा दर खाजगी रुग्णालये आकारातील. बेडस् किती उपलब्ध आहेत याबद्दल फलक रुग्णालयाबाहेर लावला जाईल.
हेही वाचा
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना बोनस देणार अन् 15000 जणांची भरती करणार
जिओची पाचवी मोठी डील, अमेरिकन कंपनी KKRने गुंतवले 11,367 कोटी
घाबरू नका! पुन्हा येणाऱ्या कोरोना लाटेचं आता नो टेन्शन, अभ्यासात नवा खुलासा