मुंबई : नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार कोरोना विषाणूदेखील रक्तातील साखरेची पातळी वाढवत असल्याचे दिसून आले आहे. ज्या कोरोनाच्या रुग्णांना मधुमेहाचा इतिहास नाही, अशा रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सतत वाढत असल्याने डॉक्टरांसाठी हे चिंताजनक ठरत आहे. रुग्णालयात असे सुमारे ४ ते ५ रुग्ण आढळत आहेत. मधुमेहाचे रुग्णही केटोएसीडोसीससारखी समस्या घेऊन रुग्णालयात येत आहेत, अशी प्रतिक्रिया डॉ. केदार तोरस्कर यांनी व्यक्त केली.एका ४१ वर्षीय महिलेला गेल्या पाच दिवसांपासून ताप येणे, घसा खवखवणे आणि अंगदुखी तसेच तीन दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होणे आदी समस्या जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सतत तहान लागणे तसेच वारंवार लघवी होणे अशी इतर कोणतीही लक्षणे तिच्यामध्ये आढळून आली नाहीत. या महिलेची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. रक्तातील साखर ५३० इतकी होती. तिचा सीरम आणि युरिन केटोन्स पॉझिटिव्ह होते. या महिलेला मधुमेहाचा पूर्वइतिहास नसल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली.कोरोनाच्या विषाणूने शिरकाव केल्यानंतर शरीरातील ग्लुकोजच्या प्रमाणावर त्याचा विपरीत परिणाम होतो, अशी माहिती डॉ. तोरस्कर यांनी दिली.तसेच कोरोना विषाणू हिमोग्लोबिनवर हल्ला करत असल्याने आॅक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना योग्य पद्धतीने रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे रुग्ण मल्टी आॅर्गन फेल्युअरकडे जातो. यामुळे मधुमेह नसलेल्या रुग्णांमध्येही मृत्यू ओढावण्याची दाट शक्यता आहे. मधुमेह नसलेल्या रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब धोकादायक ठरत आहे, असे डॉ. तोरस्कर म्हणाले.
CoronaVirus News : कोरोना विषाणू वाढवतात मधुमेह नसलेल्यांच्याही रक्तात साखरेची पातळी, संशोधनातील निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 2:23 AM