CoronaVirus News: कोरोनामुळे सन्मानचिन्ह बनविण्याचा व्यवसाय ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 01:40 AM2020-10-09T01:40:52+5:302020-10-09T01:41:06+5:30
मागणी झाली ठप्प; उद्योग बंद होण्याच्या मार्गावर
- ओमकार गावंड
मुंबई : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारने गर्दी जमेल अशा उत्सवांवर निर्बंध आणले आहेत. यामुळे दरवर्षी जल्लोषात साजरे होणारे सण व उत्सव यंदा नियम व अटींच्या बंधनात साजरे होताना दिसत आहेत. कोरोनामुळे विविध स्पर्धा, सत्कार समारंभ व उत्सव यांवर निर्बंध आणल्यामुळे सन्मानचिन्हांचा वापर अत्यंत कमी होत आहे. यामुळे सन्मानचिन्ह बनविण्याचा व्यवसाय अडचणीत आला आहे. मोठे कार्यक्रम व स्पर्धा होत नसल्याने सन्मानचिन्हांना कुठेच मागणी नाही. यामुळे हा उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहे.
सण-उत्सव म्हटले की, अनेक प्रकारचे कार्यक्रम येतात. त्यावेळेस प्रमुख मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला जातो. क्रिकेट सामने, कबड्डी सामने, फुटबॉल सामने अशा अनेक स्पर्धांची मुंबई व आसपासच्या परिसरात सतत रेलचेल सुरू असते. या स्पर्धांमध्ये विजेत्या संघाला व स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते. मात्र आता हाच सन्मानचिन्ह बनवण्याचा व्यवसाय ठप्प झाल्याचे चित्र दिसत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग व व्यवसाय संकटात सापडले आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून यातील काही व्यवसाय पुन्हा एकदा रुळावर येत आहेत. मात्र मोठ्या उत्सव व समारंभांवर अवलंबून असणारे व्यवसाय आजही संकटात आहेत.
राज्यात सगळीकडे गुढीपाडवा, शिवजयंती, आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन, दहीहंडी, गणेशोत्सव व नवरात्रोत्सव या मोठ्या सणांना सजावटीकरिता दिवे, विविध डेकोरेशन, ढोलताशा, लाऊडस्पीकर व समारंभांसाठी सन्मानचिन्ह यांची मागणी जास्त प्रमाणात असते. मात्र कोरोनामुळे हे सर्व व्यवसाय आर्थिक संकटात सापडले आहेत.
आमच्याकडे सर्व डिझाइनमधील सन्मानचिन्ह तयार आहेत. परंतु कोरोनामुळे एकही ग्राहक दुकानात फिरकत नसल्याने हे सन्मानचिन्ह धूळखात पडले आहेत. दरवर्षी या सन्मानचिन्हांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र यंदा व्यवसाय ठप्प आहे. कारखान्यातील कामगारांना पगार कसा द्यायचा, हा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे. त्यामुळे सरकारने सन्मानचिन्ह बनविणाऱ्या कलाकारांकडे व उद्योजकांकडे लक्ष द्यावे.
- सुरेश पाटील, अरुण स्पोर्टस् नोवेल्टी, विक्रोळी