CoronaVirus News : मंत्रालयात कोरोनाची दहशत; अधिकारी महासंघाचा काम बंदचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 01:16 AM2020-09-17T01:16:59+5:302020-09-17T06:23:25+5:30
मंत्री, कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा सध्या होत आहे. मंत्रालयात येणाºया अभ्यागतांची फक्त थर्मामीटर गनने तपासणी केली जाते.
मुंबई : मंत्रालयात सध्या कोरोनाची दहशत असून कर्मचारी, अधिकारी दहशतीत काम करीत आहेत. वर्ग एक आणि दोनच्या अधिकाऱ्यांसाठी १०० टक्के उपस्थितीची अट रद्द करा नाही तर काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राजपत्रित अधिकारी महासंघाने दिला आहे.
मंत्री, कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा सध्या होत आहे. मंत्रालयात येणाºया अभ्यागतांची फक्त थर्मामीटर गनने तपासणी केली जाते. कोरोनाबाधित नसल्याचे प्रमाणपत्र असेल तरच आत प्रवेश द्यावा, अशी अधिकारी, कर्मचारी मागणी करीत आहेत. मंत्र्यांच्या दालनात आलेले लोक कोणतेही सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. आजमितीस पाच मंत्र्यांची कार्यालये कर्मचाºयांना कोरोनाबाधा झाल्याने बंद आहेत.
त्यातच शासकीय अधिकाºयांची १०० टक्के उपस्थिती सामान्य प्रशासन विभागाने अनिवार्य केली आहे. वैद्यकीय सुविधांचा अभाव, वाहतुकीची पुरेशी साधने नाहीत, सुरक्षिततेची पुरेशी हमी नाही अशी परिस्थिती असताना संघटनांना विश्वासात न घेता १०० टक्के उपस्थितीचा अन्यायकारक निर्णय घेण्यात आला, असे अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी म्हटले आहे.
१०० टक्के उपस्थितीच्या अटीचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील सर्व शासकीय अधिकारी २१ सप्टेंबरला निषेध दिन पाळणार आहेत. त्या दिवशी प्रत्येक कार्यालयात निषेध बैठक घेण्यात येईल. तरीही सरकारने अट कायम ठेवली तर काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.