CoronaVirus News: मुंबईतील कोरोनाचा कहर केव्हा थांबणार; दिलासादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 11:26 AM2021-05-03T11:26:22+5:302021-05-03T11:27:07+5:30
CoronaVirus News: कोरोनापासून मुंबईला लवकरच दिलासा मिळणार
मुंबई: कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत असल्यानं मुंबईत लॉकडाऊन सुरू आहे. एप्रिलपासून ब्रेक द चेन मोहिमेला सुरुवात झाली असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा वेग आणि पॉझिटिव्हिटी रेट घटला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी आहे.
कोरोनाचा हाहाकार! गेल्या २४ तासांत ३,४१७ जणांचा मृत्यू
शहरातील लसीकरण कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहिल्यास आणि कोरोनाचा कोणताही नवा व्हेरिएंट न आल्यास मुंबईतील परिस्थिती जूनपर्यंत सर्वसामान्य होईल, असा अंदाज टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या शास्त्रज्ञांच्या एका टीमनं वर्तवला आहे. मुंबईत आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं गणिती प्रारुपाच्या मदतीनं विश्लेषण करून शास्त्रज्ञांनी ही भविष्यवाणी केली आहे. जूनमध्ये शहरातील परिस्थिती सामान्य होईल. १ जुलैपासून शहरातील शाळा सुरू करता येतील, असं अतिशय महत्त्वपूर्ण माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे.
येत्या काही दिवसांत कोरोनाचा कहर कमी होणार? महाराष्ट्र, दिल्लीचे नंबर देत आहेत संकेत
फेब्रुवारीत राज्यात कोरोना विषाणूचा एकच व्हेरिएंट होता. मात्र लोकल सेवा सुरू करण्यात आल्यानं विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला. लोकल सेवा आणि अन्य गोष्टी सुरू होताच कोरोना विषाणूच्या फैलावासाठी पोषक वातावरण तयार झालं. त्यामुळेच शहरात दुसरी लाट आली, असं निरीक्षण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी नोंदवलं आहे. फेब्रुवारीत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी निर्बंध बरेच शिथिल करण्यात आले. त्यामुळेच मार्च महिन्यात परिस्थिती गंभीर झाली, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.
कोरोना विषाणूचा सध्याचा व्हेरिएंट गेल्या वर्षी आढळून आलेल्या स्ट्रेनपेक्षा २ ते २.५ पट अधिक संक्रामक आहे. मार्चमध्ये मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढला. नव्या व्हेरिएंटमुळे कोरोनाचा फैलाव वेगानं झाला असावा, असं शास्त्रज्ञ म्हणाले. सरकारी आकडेवारीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २.३ लाख जणांना लागण झाली. तर एप्रिलमध्ये १ हजार ४७९ जणांचा मृत्यू झाला.