CoronaVirus News: कोव्हॅक्सिन केंद्रांवर कोविशिल्ड लसीचाही पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 01:19 AM2021-02-23T01:19:13+5:302021-02-23T06:55:49+5:30
लवकरच राज्यातील २३ जिल्हा रुग्णालय आणि चार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दोन्ही लसींचा पर्याय उपलब्ध हाेईल.
मुंबई : राज्यात जेथे कोव्हॅक्सिन लस उपलब्ध आहे, त्या केंद्रावर लवकरच कोविशिल्ड लसीचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात येईल. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला मिळणारा कमी प्रतिसाद पाहता आराेग्य विभागाने हा निर्णय घेतला. त्यामुळे लवकरच राज्यातील २३ जिल्हा रुग्णालय आणि चार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दोन्ही लसींचा पर्याय उपलब्ध हाेईल.
केंद्र शासनाने लसीकरण प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आराेग्य कर्मचाऱ्यांना लसीविषयी निवड करण्याचा हक्क नसेल असा निर्णय घेतला होता; मात्र आता या निर्णयात बदल करून दोन्ही लसींचा पर्याय उपलब्ध असेल. जे. जे. रुग्णालयात सिरमच्या कोविशिल्ड लसीचा हजार डोसचा साठा उपलब्ध झाला आहे. हे डोस येत्या आठवड्यापासून वापरण्यात येतील. सोमवार ते गुरुवार कोव्हॅक्सिनसाठी तर शुक्रवार- शनिवार कोविशिल्ड लसीसाठी राखून ठेवण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे.
लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले की, केंद्र शासनाने पूर्वी केवळ कोव्हॅक्सिन लस पुरविली होती, आता मात्र दोन्ही लसी उपलब्ध आहेत; परंतु दोन्ही लसी एकाच वेळी न देता वार, वेळ निश्चित करून देण्यात येतील. आतापर्यंत राज्यात ५.८ लाख लोकांनी कोविशिल्ड तर ५,५०० लाभार्थ्यांनी कोव्हॅक्सिन लस घेतली आहे.
एका वेळी दोन लसी स्वीकारण्यास नकार!
जे. जे. रुग्णालयात आतापर्यंत ९०० डॉक्टरांनी कोव्हॅक्सिनचा डोस घेतला. कोणत्याही लाभार्थ्याने स्वतःहून कोविशिल्ड लसीची मागणी केलेली नाही; मात्र केंद्राने १००० कोविशिल्ड लसीचे डोस स्वीकारण्यास सांगितले आहे, तसेच अमरावती येथील रुग्णालयातही याप्रमाणेच कोविशिल्ड लसीचे डोस पुरविण्यात आले. अन्य रुग्णालय किंवा लसीकरण केंद्रांनी एका वेळी दोन लसी स्वीकारण्यास मनाई केली आहे, अशी माहिती डॉ. ललित संख्ये यांनी दिली.