CoronaVirus News : 'अर्सेनिक अल्बम ३०' घेण्याचा विचार करत असाल, तर आधी हे वाचाच!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 06:50 AM2020-05-23T06:50:43+5:302020-05-23T10:41:51+5:30
आयुष मंत्रालयाने ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या गोळ्यांचे सेवन करण्याचा सल्ला नागरिकांना दिल्याने ठिकठिकाणी लाखोंच्या संख्येने या गोळ्यांचे वाटप संस्था आणि तसेच राजकारण्यांकडून केले जात आहे.
मुंबई : कोरोना आजारापासून वाचण्यासाठी आवश्यक असलेली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आयुष मंत्रालयाने अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्या घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र त्याचे सेवन करण्यापूर्वी व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक आरोग्य तपासणी आवश्यक असल्याने होमिओपॅथिक डॉक्टरचा सल्ल्यानेच त्यांचे सेवन करणे गरजेचे असल्याने तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोरोना विषाणूमुळे मुत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या देशात वाढीस लागली आहे. आयुष मंत्रालयाने ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या गोळ्यांचे सेवन करण्याचा सल्ला नागरिकांना दिल्याने ठिकठिकाणी लाखोंच्या संख्येने या गोळ्यांचे वाटप संस्था आणि तसेच राजकारण्यांकडून केले जात आहे. विशेषत: झोपडपट्टी परिसरात तसेच पोलीस आणि अन्य कोविड योद्ध्यांनाही त्या वाटल्या जात आहेत. मात्र होमिओपॅथिक डॉक्टरच्या सल्ल्याने या गोळ्या घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत डॉ. संगीता पिल्ले यांनी व्यक्त केले आहे.
आम्ही होमिओपॅथीमध्ये रुग्णाला औषध देताना त्याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य पडताळून पाहतो. त्यानंतर लक्षणांचा अभ्यास करून नंतरच एखाद्याला विशिष्ट औषध घेण्याचा सल्ला दिला जातो. तसेच त्यासोबत काही पथ्य आणि औषध कोणत्या वेळेत कसे घ्यायचे हेदेखील समजावून सांगितले जाते. डॉक्टरच्या सल्ल्याने औषध न घेतल्यास उपचार आणि औषधांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची भीती असते. प्रत्येक व्यक्तीचे वय आणि शारीरिक स्थिती यानुसार औषधांचा डोस कमी अधिक करणे गरजेचे असते, असे पिल्लई यांनी स्पष्ट केले.