मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात काही अपवाद वगळता पोलीस कर्मचारी तसेच येथे येणारे नागरिक मास्क लावून दिसले. तसेच अनेकांच्या हातात सॅनिटायझर दिसून आले. पोलीस आयुक्त कार्यालयात दिवसाला शेकडो जणांची ये-जा सुरू असते. अशात प्रवेश करतेवेळी काही जणांचा नाकावरून सरकलेला मास्क आतमध्ये येताना पुन्हा नाकावर दिसला, तर बरेच पोलीस ऑन मास्क दिसले. यात, चर्चा करतानाही काही ठिकाणी पोलिसांचा मास्क उतरताना दिसला नाही.
तसेच अनेकांच्या हातात सॅनिटायझरची बॉटल दिसून आली, तर काही जण झाडाखाली विनामास्कही फिरताना दिसून आले. येथे येणाऱ्या नागरिकांसाठी मुख्य प्रवेशद्वारात तसेच प्रत्येक इमारतीच्या प्रवेशद्वारात सॅनिटायझर मशीन ठेवण्यात आली आहे. तसेच मास्कशिवाय कुणालाही परवानगी नाही. त्यामुळे आयुक्त कार्यालयात नियमांचे पालन होताना दिसून आले. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्प्यात सॅनिटायझरचा फवारा करणारे प्रवेशद्वार उभे करण्यात आले होते. मात्र, अनलॉकच्या काळात ते बंद करण्यात आले.