Join us

CoronaVirus News: कोरोनामुळे ३८मंडळांनी गणेशोत्सव केला रद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 1:19 AM

के पश्चिम वॉर्ड; १५ मंडळांनी विसर्जनाचा कालावधी केला कमी

- मनोहर कुंभेजकर मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी के पश्चिम वॉर्डमध्ये अनेक गणेशोत्सव मंडळांनी त्यांचा विसर्जनाचा कालावधी यंदा कमी केला आहे, तर सुमारे ५० टक्के सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यंदा गणपती उत्सव साजरा करणार नाहीत. के पश्चिम वॉर्डचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. मंडळाच्या या निर्णयाचे पालिकेने स्वागत केले आहे़पर्यावरणाचे रक्षण करून शाडूच्या मातीच्या मूर्ती, घरगुती आरास व इतर बाबींचा उपयोग करून श्रीगणेशोत्सव साजरा करूया आणि एक प्रभाग एक सार्वजनिक गणपती योजना राबवूया ही संकल्पना राबवण्याचा प्रस्ताव विश्वास मोटे यांनी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिला होता.परिमंडळ ४ चे उपायुक्त रणजित ढाकणे यांच्या उपस्थितीत आम्ही येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची बैठक घेतली आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची भूमिका मोठी असून पालिका प्रशासनाला त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.पालिकेच्या प्रयत्नांना यश आले असून, के पश्चिम वॉर्डमध्ये आजमितीस ३८ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव केला रद्ध, तर १५ मंडळांनी विसर्जनाचा कालावधी कमी केला असल्याची माहिती त्यांनी दिली.के पश्चिम वॉर्डमध्ये गेल्या वर्षी प्रतिष्ठापना केलेल्या ८८ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी सध्या तरी ३८ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणेशोत्सव साजरा करणार नाहीत. तर ११ मंडळांनी १० दिवसांऐवजी दीड दिवस, २ मंडळांनी ५ दिवस, तर २ मंडळांनी ७ दिवस गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचे मान्य केल्याची माहिती मोटे यांनी दिली.यावर्षी गणेशमूर्ती ही चार फुटांच्या आतील असल्याने पालिकेतर्फे के पश्चिम वॉर्डमध्ये पुरेशा प्रमाणात कृत्रिम तलाव उभारणार असून पालिकेतर्फे सर्व सुविधाही पुरवण्यात येणार आहेत.तसेच गृहनिर्माण सोसायटीच्या प्रवेशद्वारावरच गणेशमूर्ती स्वीकारणार आहे. त्यामुळे यंदा गणेशभक्तांनी कृत्रिम तलावातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन विश्वास मोटे यांनी शेवटी केले आहे.सुमारे ६.५ लाख लोकवस्तीच्या या वॉर्डमध्ये विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम व जोगेश्वरी पश्चिम हे तीन मोठे विभाग येतात. या वॉर्डमध्ये सुमारे १०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून दरवर्षी संकष्टीला विसर्जन होणारा आणि नवसाला पावणारा अंधेरीचा राजा हा या वॉर्डमध्ये येतो.दरवर्षी लाखो गणेशभक्त अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येतात. तसेच वर्सोवा मेट्रो स्थानक, मॉडेल टाऊन येथील स्वप्नाक्षय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डी.एन. नगर सार्वजनिक मंडळाचा महागणपती यांच्या दर्शनालाही गणेशभक्तांची दरवर्षी गर्दी होते. तर जुहू चौपाटी, सात बंगला चौपाटी, वेसावे कोळीवाडा येथे गणपती विसर्जनाला गणेशभक्तांची मोठी गर्दी होते.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या