मुंबई : पालिकेच्या अथक प्रयत्नांनंतर नियंत्रणात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या १७ दिवसांत कोरोनाचे २८,०७६ नवीन बाधित रुग्ण आढळले असून, ६०४ रुग्णांचा मृत्यू झाला. २६ आॅगस्टला रुग्ण दुपटीचा कालावधी ९३ दिवस होता. १२ सप्टेंबरला तो ५८ दिवसांवर आला आहे. १७ दिवसांत हा कालावधी ३५ दिवसांनी घसरला आहे.सक्रिय रुग्णांची संख्या १०,१५४ने वाढली आहे. २६ आॅगस्टला कोरोना रुग्णसंख्या १ लाख ३९ हजार ५३२ होती. ७,५०२ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर १८ हजार ९७७ सक्रिय रुग्ण होते. १ लाख १२ हजार ७४३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला होता. रुग्ण बरे होण्याचा दर ८१ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ९३ दिवस होता. गेल्या १७ दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. १२ सप्टेंबरला रुग्णांची संख्या १ लाख ६७ हजार ६०८ वर तर मृतांचा आकडा ८,१०६ होता. सक्रिय रुग्णांची संख्या २९,१३१ झाली. १ लाख ३० हजार १६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्ण बरे होण्याचा दर ७८ टक्के तर रुग्ण दुपटीचा काळ ५८ दिवसांवर घसरला.गणेशोत्सवादरम्यान भेटीगाठीत निकटचा संपर्क, अनलॉकच्या चौथ्या टप्प्यानंतर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडलेले लोक, फिजिकल डिस्टन्सचा फज्जा, यामुळे रुग्ण पुन्हा वाढत असल्याचे चित्र आहे.चाचण्यांमध्ये वाढबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात असून, त्यांची तत्काळ तपासणी केली जात आहे. रोजच्या चाचण्यांमध्येही वाढ केल्याने कोरोनाची आकडेवारी वाढलेली दिसत असल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.
CoronaVirus News : मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ९३ वरून ५८ दिवसांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 4:10 AM