CoronaVirus News : धक्कादायक! रात्री पत्नीचा तर सकाळी पतीचा कोरोनामुळे मृत्यू, दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 09:19 AM2020-05-31T09:19:41+5:302020-05-31T09:20:14+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. यासाठी पोलीस, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी आणि प्रशासनातील इतर घटक युद्ध पातळीवर काम करत आहेत.
मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. यासाठी पोलीस, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी आणि प्रशासनातील इतर घटक युद्ध पातळीवर काम करत आहेत. परंतू हे कर्तव्य पार पाडत असताना काही कोरोनायोद्ध्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून येत आहे.
मुंबईतील नायर हॉस्पिटलमधील लॅबमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा आणि त्यांच्या पत्नीचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याबाबत नायर हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजी विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. कोरोनाची बाधा झाल्यामुळे नायर हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर आदल्याच रात्री त्यांच्या पत्नीचाही कोरोनामुळेच मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना योद्ध्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे यापुढे कोरोनावर मात करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्याची अजून मोठ्या प्रमाणात काळजी घ्यावी लागणार आहे. याचबरोबर, मुंबईतील पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काल एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 52 वर्षीय दिपक हाटे नावाच्या पोलीस हवालदाराचा 10 दिवस उपचार घेतल्यानंतर घरी सोडल्यावर घरात मृत्यू झाला. ते बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते.
दरम्यान, राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात ११.३ दिवस होता, तो आता १७.५ दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग १७.१ दिवस आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४३.०७ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्के आहे. राज्यात ९९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ४७ हजार ६७२ नमुन्यांपैकी ६५ हजार १६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ४३ शासकीय आणि ३४ खाजगी अशा ७७ प्रयोगशाळा निदानासाठी कार्यरत असून राज्यातील प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण प्रति दशलक्ष ३३४९ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २५२३ एवढे आहे. सध्या राज्यात ५ लाख ५१ हजार ६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ६८१ खाटा उपलब्ध असून सध्या ३५ हजार ४२० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. या कालावधीतील ५९ मृत्यूंमध्ये मुंबई ३५, पनवेल -७, ठाणे -६, वसई विरार – ६, नवी मुंबई -२, कल्याण डोंबिवली -१ जळगाव- १ तर १ मृत्यू यांचा समावेश आहे.