CoronaVirus News: कोरोना लढ्यात सहभागी अभियंत्यांमध्ये नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 02:04 AM2020-10-10T02:04:45+5:302020-10-10T02:05:01+5:30
संघटनेने मांडली व्यथा; मूळ जागी पुन्हा बोलावण्याची मागणी
मुंबई : कोरोना लढ्यात महापालिकेत काम करणाऱ्या शिपायापासून अभियंत्यापर्यंत सर्वच दिवसरात्र कार्यरत आहेत. यापैकी काही कर्मचाऱ्यांना कालांतराने त्यांच्या मूळ खात्यात बोलाविण्यात आले. मात्र कोरोनाच्या कामातून अभियंत्यांची सहा महिन्यांनंतरही सुटका झालेली नाही. कोरोनाचा संसर्ग होऊन पाच अभियंत्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे अशा चारशे अभियंत्यांना त्यांच्या मूळ जागी परत बोलावण्याची मागणी केली जात आहे.
कोरोना रोखण्यासाठी पालिकेने बहुतांशी कर्मचाºयांना जबाबदाºया वाटून दिल्या. अभियांत्रिकी खात्यातील उपप्रमुख अभियंत्यापासून कनिष्ठ अभियंत्यांपर्यंत चारशे जणांचा या लढ्यात समावेश करण्यात आला आहे. गेले सहा महिने त्यांना साप्ताहिक सुट्टीदेखील देण्यात आलेली नाही. त्यामुळे अभियंता वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे.
कोरोना लढ्यात काम करणाºया अन्य कर्मचाºयांना परत त्यांच्या खात्यात पाठवून बदली कामगार देण्यात आले आहेत. मात्र या अभियंत्यांना अद्याप कोणतीही सूट देण्यात न आल्याने त्यांच्यात अस्वस्थता वाढत आहे. अभियंत्यांना त्यांच्या विभागात परत पाठवा, अशी मागणी इंजिनीअर्स युनियन संघटनेचे सरचिटणीस यशवंत धुरी यांनी आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.
विविध कामांमुळे त्रस्त
कोरोनाबाधित रुग्ण शोधणे, बाधित क्षेत्र शोधणे, बाधित इमारती प्रतिबंधित करणे, कोरोनाबाधितांचा अहवाल तयार करणे, अन्नवाटप अशी कामे अभियंत्यांना देण्यात आली आहेत. तसेच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची कागदपत्रे तपासणे, त्यांच्या कोरोना टेस्ट करणे आणि त्यांना हॉटेलवर सोडण्याची जबाबदारी ४० अभियंत्यांवर सोपविण्यात आली आहे.
महापालिकेच्या २६०० कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली असून, १६० कर्मचाºयांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जल अभियंता खात्याचे प्रमुख, कार्यकारी अभियंता अशा पाच अभियंत्यांचा समावेश आहे.