CoronaVirus News: मृत्यू झालेल्या कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबीयांच्या नशिबी केवळ संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 01:18 AM2020-10-07T01:18:35+5:302020-10-07T01:18:48+5:30
लढा आधी कोरोनाशी आणि आता नातेवाइकांचा मदतीसाठी
मुंबई : कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत कोविड योद्ध्यांचे योगदानही मोठे आहे. वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार, अग्निशमन दल, बेस्ट कर्मचारी असे हजारो कर्मचारी- अधिकारी गेले सहा महिने दिवसरात्र कोरोनारूपी संकटाशी झुंज देत आहेत.
मात्र या लढ्यात आपला जीव गमावल्यानंतरही या कोविड योद्ध्यांची परवड थांबलेली नाही. तांत्रिक त्रुटी, काही नियमात अडथळे, काहींची कागदपत्रे अपूर्ण असल्याने अनेकांच्या कुटुंबीयांना शासकीय मदतीसाठी वणवण करावी लागत आहे.
लढ्यात मृत्युमुखी पडलेल्या योद्ध्यांच्या कुटुंबीयांना केंद्र्र सरकारकडून ५० लाख रुपये आर्थिक मदत, तर संबंधित प्राधिकरणामध्ये वारसांना नोकरीचे आश्वासन मिळाले होते. मात्र आतापर्यंत जेमतेम २५ ते ३० टक्के मृतांच्या कुटुंबीयांना मदत मिळाली आहे. मुंबई पोलीस दलातील १० अधिकारी आणि ७४ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. यापैकी ४० जणांना मदत मिळाली आहे. मुंबई पोलिसांकड़ून जाहीर केलेली १० हजार रुपयांची मदत तातडीने त्यांच्या खात्यात जमा झाली आहे. तसेच पोलिसांकड़ून हवे तसे सहकार्यही करण्यात आले.
माझे पती परत मिळणार का?..
शासन आज-उद्या मदत करेल. पण माझे पती पुन्हा मिळणार आहेत का? सध्या प्रशासनाने अन्य पोलिसांसाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसे झाले नाही़ शासनानेही तातडीने सर्वांना सहकार्य करणे गरजेचे आहे.
- पोलीस पत्नी, वरळी
पोलिसांसाठी कोविड हेल्पलाइन कक्ष
पोलिसांना वेळीच वैद्यकीय सुविधा मिळावी म्हणून पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पोलिसांसाठी कोविड हेल्पलाइन कक्ष सुरू केला. याला पोलिसांचे तब्बल ४ हजार ५७४ कॉल आले. यापैकी २ हजार ७०७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती.
कुटुंब कसे चालवायचे?
कर्तव्यावर असताना पतीला कोरोना झाला. मात्र रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर त्यांचा मार्चमध्ये मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना संशयित रुग्ण असल्याने अद्याप मदत मिळालेली नाही. प्रशासनाकडे चार वेळा अर्ज केले आहेत. बेस्टमध्ये नोकरी मिळेल या आशेवर आहे.
- बेस्ट कर्मचाºयाची पत्नी
यंत्रणांमध्ये नाराजी
अजूनही खासगी सेवा देणाºया डॉक्टरांविषयी यंत्रणांमध्ये नाराजी दिसून आलेली आहे. अनेकदा स्मरण देऊनही राज्य सरकारकडून प्रतिसाद आलेला नाही. या शहीद डॉक्टरांच्या अर्जांना नाकारण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- डॉ. शिवकुमार उत्तुरे, इंडियन मेडिकल असोसिएशन, सदस्य
कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र सर्व कागदपत्रे जमा करणे, त्यांची छाननी करणे या प्रक्रियेमध्ये बराच कालावधी लागतो. पण त्यांच्या वारसांना निश्चितच न्याय मिळेल.
- किशोरी पेडणेकर,
महापौर, मुंबई