Join us

CoronaVirus News : माजी खासदार निलेश राणेंना कोरोनाची लागण, सेल्फ क्वारंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 7:57 PM

गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनीही स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे.

ठळक मुद्देमाजी खासदार निलेश राणे यांनी चार दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये कोरोना चाचणी केली होती.

मुंबई : सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्विट करून माहिती दिली आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्यामुळे चाचणी केली आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे. तसेच, गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनीही स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे.

"कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करुन घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी", असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

दरम्यान, माजी खासदार निलेश राणे यांनी चार दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये कोरोना चाचणी केली होती. मात्र, त्यावेळी या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर शनिवारी त्यांनी पुन्हा मुंबईत कोरोनाची चाचणी केली. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.

आतापर्यंत राज्यातील अनेक मंत्री आणि नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कालच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तर खासदार नवनीत राणा कौर आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.  

याशिवाय, काही दिवसांपूर्वीच भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली होती. यापूर्वी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनाही कोरोनाची लागण झाली होती. 

टॅग्स :निलेश राणे महाराष्ट्रात कोरोना व्हायरस