CoronaVirus News: जिनोम सिक्वेन्सिंग लॅबमुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 07:14 AM2021-08-09T07:14:24+5:302021-08-09T07:15:01+5:30
एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर चाचण्या शक्य; उपचारांना येणार वेग
मुंबई : पालिकेच्या नायर रुग्णालयात नुकतीच ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ लॅब सुरू करण्यात आली आहे. यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईला बळ प्राप्त झाले आहे. कोविड विषाणूचे नवनवीन प्रकार समोर येत असताना जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करून उपचारांना वेग देणे शक्य होणार आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गाचे निदान ‘आरटीपीसीआर’ चाचणीत होते. परंतु हा संसर्ग कोरोनाच्या उत्परिवर्तित रूपापासून झाला आहे का हे पडताळण्यासाठी ‘जनुकीय क्रमनिर्धारण’ ही प्रगत चाचणी करणे आवश्यक असते. नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग ही पद्धती वापरून विषाणूंचे जनुकीय सूत्र ओळखता येते. त्यामुळे एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील नेमका फरक ओळखता येतो. असा फरक ओळखू आल्यानंतर उपचार पद्धतीची दिशा स्पष्ट होते. जिनोम सिक्वेसिंग वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये काचवेळी मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय नमुन्यांची चाचणी करता येणे शक्य आहे.
अमेरिकेतील इलुम्निया या कंपनीने, अमेरिकेतीलच अल्ब्राइट स्टोनब्रिज ग्रुप (एएसजी - बोस्टन) या संस्थेच्या माध्यमातून सहा कोटी ४० लाख रुपयांचे दोन जिनोम सिक्वेसिंग संयंत्र मुंबई पालिकेला दान स्वरूपात दिले आहेत. त्यासोबत एटीई चंद्रा फाउंडेशन यांनीदेखील सुमारे चार कोटी रुपयांची मदत या संयंत्रांसाठी आणि त्याद्वारे होणाऱ्या चाचण्यांसाठी केली आहे. हे जिनोम सिक्वेसिंग संयंत्राद्वारे एकाचवेळी ३८४ नमुन्यांची तपासणी होऊन चार दिवसांच्या आत वैद्यकीय निष्कर्ष प्राप्त होऊ शकतात.
विषाणूतील जनुकीय बदलही शोधता येणार
नायरमधील प्रयोगशाळेने अभ्यासतत्त्वावर आयआयटीतील ‘हेस्टॅक अॅनॅलॅटिक्स’ कंपनीच्या मदतीने १०० नमुन्यांच्या ‘जनुकीय क्रमनिर्धारण’ चाचण्या केल्या आहेत. विषाणूच्या जनुकीय रचनेच्या मदतीने संसर्गाचा प्रसार कसा होत आहे याचे मोजमाप तसेच विषाणूच्या जनुकीय रचनेत झालेले बदलही शोधण्याचे तंत्रज्ञान कंपनीने विकसित केले आहे. त्याच्या मदतीने शहरातील १०० नमुन्यांची तपासणी प्रयोगशाळेने केली असून, त्यांची विश्लेषणात्मक तपासणी सुरू आहे. याव्यतिरिक्त मुंबईतून जवळपास १५० नमुने चाचणीसाठी ‘एनआयव्ही’ला पाठविले आहेत, अशी माहिती नायरमधील प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ. जयंती शास्त्री यांनी दिली.
अमेरिकी संस्थेशी करार
जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्यांसाठी पालिका अमेरिकेतील सामाजिक संस्थेशी करार करीत असून, आयआयटीच्या ‘हेस्टॅक अॅनॅलिटिक्स’बरोबरही प्राथमिक चर्चा सुरू आहे. गेल्या महिन्याभरात मृत्यू झालेल्या बाधितांचे नमुने पालिकेकडे आहेत, सुरुवातीला त्यांच्या चाचण्या केल्या जातील. टप्प्याटप्प्याने याचा विस्तार केला जाईल. तिसऱ्या टप्प्यात रुग्णसंख्या वाढायला लागली की या रुग्णांमध्ये विषाणूचे उत्परिवर्तन होत आहे का याचे निदान करण्यासाठी ही प्रयोगशाळा महत्त्वाची भूमिका बजावेल. जनुकीय क्रमनिर्धारणच्या माध्यमातून हाती आलेल्या माहितीचा वापर कसा करावा यासाठी डॅशबोर्ड तयार केला जाणार आहे. त्यासाठी जैवसांख्यिकी तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. त्यासाठी ‘हेस्टॅक अॅनॅलिटिक्स’ची मदत घेतली जाणार आहे, असे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.