मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मुंबई महापालिका याला आळा घालण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र, आता रुग्णांची वाढती संख्या पाहता, रुग्णाने मिळेल ते रुग्णालय घ्यावे, मिळेल तो बेड घ्यावा आणि उपचाराला सुरुवात करत सहकार्यदेखील करावे, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी रविवारी भायखळा येथील महापौर निवासात आयोजित पत्रकार परिषदेत केले.पेडणेकर म्हणाल्या की, मुंबई महापालिकेकडे व्हेंटिलेटर बेडचा तुटवडा नाही. बेड अपुरे पडणार नाहीत. घरोघरी जे लसीकरण करावयाचे आहे त्यासाठी मुंबई महापालिकेने राज्य सरकारला पत्र पाठवले आहे. राज्य सरकार याबाबत केंद्र सरकारशी बोलणार आहे. कोरोनाची ताकद दुपटीने वाढली आहे. परिणामी आपले रुग्ण दगावू शकतात. त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करा. स्वत:वरील उपचार सुरु करा. मुंबई महापालिकेकडे कोणत्याचा आरोग्य सेवेची कमतरता नाही. मात्र, नागरिकांनी आता सहकार्य करण्याची गरज आहे. डॅश बोर्डवर सगळे अपडेट दिले जात आहेत. कोणतीच गोष्ट लपवली जात नाही. जास्तीत जास्त बेड उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आयसीयू आणि ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देत आहोत. आपली तपासणी इतर राज्यांच्या तुलनेत पुढे आहे. आपले काम वेगाने सुरु आहे, असे त्यांनी सांगितले. मिळून काम करू या आणि कोरोनाला हरवू या!रुग्णसंख्या वाढत आहे, त्यामुळे प्रत्येकाने सहकार्य करण्याची गरज आहे. सोसायटीने मदत केली पाहिजे. कोरोना नाही, असे दाखविण्याचा प्रयत्न करू नका. यावर राजकारणही करू नका. कोणाच्याही जीवाशी खेळू नका, गोंधळ घालू नका, असेही आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केले. प्रत्येकाच्या जीवाची किंमत आहे. त्यामुळे मिळून काम करूया आणि कोरोनाला हरवूया, असे आवाहनही त्यांनी केले.
CoronaVirus News: मिळेल ते रुग्णालय घ्या अन् उपचार सुरू करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 3:41 AM