मुंबई : कोरोना चाचण्या कमी होत असल्याने बाधित रुग्णांच्या संख्येत घट दिसत असल्याची टीका महापालिकेवर केली जात होती. मात्र, गुरुवारी तब्बल ४४ हजार चाचण्या केल्यानंतरही बाधित रुग्णांचे प्रमाण ९.९४ टक्के म्हणजेच एक अंकी असल्याचे आढळून आले. तसेच काेराेनाबाधित रुग्णांसाठीच्या तब्बल ५,७२५ खाटा रिक्त असल्याचा दावाही पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी शुक्रवारी केला.
फेब्रुवारीच्या मध्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढली. दररोज नऊ ते दहा हजार बाधित रुग्ण आढळून येऊ लागले. यामुळे वैद्यकीय यंत्रणेवरील ताण वाढला. सक्रिय रुग्णांचा आकडा ९० हजारांपर्यंत पोहोचल्याने पालिका आणि खासगी रुग्णालयातही खाटा कमी पडू लागल्या होत्या. त्यामुळे पालिका प्रशासनाने टप्प्याटप्प्याने खाटांची संख्या वाढवून जवळपास २२ हजारांपर्यंत नेली.
१ एप्रिलला मुंबईतील पॉझिटिव्हिटी दर २०.८५ टक्के होता, तर ४ एप्रिल रोजी हेच प्रमाण सर्वाधिक म्हणजे २७. ९४ टक्के होते. त्यानंतर पॉझिटिव्हिटी दरात घट होत गेली. त्यानुसार २८ एप्रिलला हा दर ११.९३ टक्के तर २९ एप्रिलला ९.९४ टक्क्यांवर आला. गुरुवारी ४३ हजार ५२५ चाचण्या करण्यात आल्या. गुरुवारी तब्बल ४४ हजार चाचण्या केल्यानंतरही बाधित रुग्णांचे प्रमाण ९.९४ टक्के म्हणजेच एक अंकी असल्याचे आढळून आल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.
यामुळेच पॉझिटिव्हिटी दरात घट
बाधित रुग्णांना शोधणे (चेस दि व्हायरस धोरण), विभागस्तरावरील वॉर रूममार्फत रुग्णांना खाटा उपलब्ध करणे, जंबो फिल्ड रुग्णालयाची निर्मिती करणे तसेच खाटांची संख्या वाढविणे, आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवणे, खासगी रुग्णालयाने दिलेले सहकार्य, पालिका कर्मचारी - अधिकारी यांनी दिवसरात्र केलेली मेहनत यामुळे पॉझिटिव्हिटी दर कमी आणण्यात यश आले आहे. - इक्बाल सिंह चहल (आयुक्त, मुंबई महापालिका)
सद्य:स्थितीत उपलब्ध खाटापालिका आणि खासगी १७२ रुग्णालयांत एकूण २१ हजार ७९६ खाटा उपलब्ध होत्या. यापैकी सध्या पाच हजार ७२५ खाटा रिकाम्या आहेत.ऑक्सिजन खाटा उपलब्ध : १०,६१६रिकाम्या : १४७९अतिदक्षता विभाग उपलब्ध : २८९४रिकाम्या : ५७व्हेंटिलेटर उपलब्ध : १४८२रिकाम्या : २१