मुंबई : कोरोनाचे संकट हाताळणीत राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. राज्य सरकारचा प्रत्येक बाबतीतला नाकर्तेपणा समोर येत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मंगळवारी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात माजी मंत्री विनोद तावडे, आशीष शेलार, खा. गोपाळ शेट्टी, खा. मनोज कोटक, आ. अतुल भातखळकर यांचा समावेश होता. फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले की, राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे सर्वाधिक कोरोना रूग्ण आणि सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात दिसून येतात. ही संख्या दररोज वाढतच आहे. अनेक लोकांना उपचार मिळत नाहीत. कोणत्या रूग्णालयात किती खाटा शिल्लक आहेत, याची कुठलीही माहिती दिली जात नाही.शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत आहे. शेतमाल खरेदीसाठी कोणतीही यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. बारा बलुतेदारांवरसुद्धा संकट आहे. केंद्र सरकारने पॅकेज जाहीर केले. विविध राज्यांनी सुद्धा पॅकेज जाहीर केले. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात एकही पॅकेज जाहीर होऊ नये, हे गंभीर आहे. स्थलांतरित कामगारांचे महाराष्ट्रात प्रचंड हाल झाले. केंद्र सरकारने रेल्वे उपलब्ध करून दिल्या. केंद्राने त्याचे ८५ टक्के पैसे दिले आणि राज्यांना केवळ १५ टक्के द्यायचे होते. मात्र महाराष्ट्रातील अज्ञानी मंत्र्यांना रेल्वेसाठी किती खर्च येतो, हेच माहिती नाही. अशा सर्व प्रकारांमुळे महाराष्ट्र बचावची भूमिका घेऊन आम्ही हे आंदोलन करीत आहोत, असेही फडणवीस म्हणाले.केंद्र सरकारने कितीही मोठे पॅकेज दिले, तरी राज्य सरकार केंद्राकडेच बोट दाखविते आहे. इतरांनी सूचना केल्या तर ते राजकारण नाही आणि आम्ही सूचना केल्या की, लगेच राजकारणाचा आरोप केला जातो. महाराष्ट्राने विमाने उतरण्यास परवानगी द्यावी, त्यांना १४ दिवस क्वॉरंटाईनमध्ये ठेवता येईल, असेही त्यांनीसांगितले.
CoronaVirus News : कोरोना हाताळणीत सरकार अपयशी; फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यपालांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 3:10 AM