मुंबई : वयाची शंभरी पार करण्यासाठी अवघे दोन आठवडे असताना आजोबांना कोरोना झाला आणि शतकपूर्ती सोहळ्याच्या तयारीला लागलेल्या कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकला. आजोबांना तत्काळ जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेथे कोरोनाच्या भीतीने तरुणही गर्भगळीत होतात तेथे आजोबांनी कमालीचे धैर्य दाखवत कोरोनावर मात केली. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर-कर्मचाऱ्यांनी मंगळवारी रुग्णालयातच त्यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना डिस्चार्ज दिला.पूर्वीच्या देवगड तालुक्यातील नारिंग्रे गावचे रहिवासी असलेले अर्जुन नारिंग्रेकर यांचा जन्म १५ जुलै १९२० रोजी झाला. सध्या ते कांदिवली येथे आपल्या मुलाच्या घरी राहतात. या वर्षी १५ जुलै रोजी ते वयाची शंभरी ओलांडून १०१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. कोरोनामुळे घरच्या घरीच त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी सुरू असताना त्यांच्या घरातील काही सदस्य व त्यानंतर आजोबांनाही १ जुलै रोजी कोरोनाची लागण झाली.पालिका रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना निमोनिया झाला. त्यामुळे आजोबांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल केले. वय अधिक असल्याने ते औषधाला कितपत प्रतिसाद देतील, याबाबत साशंकता होती. परंतु, शिक्षक म्हणून निवृत्त झालेल्या आजोबांनी उपचाराच्या बळावर जिद्दीने कोरोनावर मात केली.पालिका रुग्णालयातील डॉक्टरांकडून मिळणारे योग्य उपचार, जेवणाच्या आणि औषधाच्या वेळा काटेकोरपणे पाळत आजोबा कोरोनामुक्त झाले. ‘कशाला बाळगायची कोरोनाची भीती? हिमतीने लढल्यास योग्य उपचाराच्या बळावर कोरोनावर सहज मात करता येते,’ हा जीवनाच्या शाळेत समर्थपणे जगण्याचा धडा त्यांनी सर्वांनाच गिरवण्याची प्रेरणा दिली.
CoronaVirus News : जिद्दीने कोरोनावर मात करत आजोबांची शतकपूर्ती, निमोनियालाही लावले पळवून
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 3:18 AM