- सचिन लुंगसे मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाउन आहे. याचा फटका फळांचा राजा असलेल्या आंब्यालाही बसला आहे. ऐन हंगामात शेतकऱ्यांना आंबा बाजारपेठेत पोहोचविणे अवघड झाले आहे. विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोकणातला हापूस राज्य, देशासह परदेशात पोहोचविण्यात यश मिळत असले तरी कोरोनामुळे आंबा उत्पादकांना ५० टक्के आर्थिक तोटा झाल्याचे समोर आले आहे.
देवगड, राजापूर, रत्नागिरी, वेंगुर्ला, गुहागर, दापोली, श्रीवर्धन, अलिबाग येथून कोकणातला हापूस मुंबईत दाखल होतो. गेल्या ६० दिवसांचा विचार केल्यास दरवर्षी मुंबईत या कालावधीत सुमारे ५० लाख पेट्या येतात. पण यंदा फक्त २५ ते ३० लाख पेट्या आल्या. दलाल आणि उत्तर भारतीय विक्रेते दरवर्षी मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात विकतात. पण यंदा कोरोनाच्या भीतीने उत्तर भारतीय आपापल्या घरी निघाल्यामुळे कोकणातील तरुण आणि शेतकऱ्यांनी थेट आंबा बाजारात विकला. तरीही बाजारात केवळ ५ लाख पेट्या विकल्या गेल्या. कोरोना संकटामुळे दरवर्षीच्या तुलनेत शेतकºयाच्या गाठीशी फारच कमी पैसे आले. नफा न होता सरासरी ५० टक्के तोटा झाला.
अॅपचा आधार फायदेशीर
कोरोनाच्या काळात मोबाइलचा वापर वाढला आहे. कोकण भूमी प्रतिष्ठान आणि ग्लोबल कोकणने मुंबई, पुण्यात आंबे पोहोचविण्यासाठी कोकण हापूस अॅपचा आधार घेतला आहे. आधुनिक तंत्राद्वारे फळांचा राजा घराघरात दाखल होत आहे. देवगड, राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली, श्रीवर्धन आणि अलिबाग येथील हापूस मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार येथील ग्राहकांना मिळाला आहे.- संजय यादवराव, संस्थापक, कोकण भूमी प्रतिष्ठान
थेट बाजारपेठ
कोकणातील शेतकºयांना या वर्षी थेट बाजारपेठ मिळाली. त्यांनी बागेत आंबे पॅक करून ते स्वत:च लोकांपर्यंत पोहोचविले. यामुळे दलालांचा हस्तक्षेप टाळता आला, असे शेतकºयांनी सांगितले.देवगड हापूसची राजधानी : मुंबईमध्येच नाही तर जगात हापूस आंब्याला जास्त मागणी आहे. कोकणातील देवगडच्या पायरी हापूसची चव सर्वाधिक आवडीने चाखली जाते. देवगड ही हापूसची राजधानी ठरल्याचे मत विक्रेत्यांनी व्यक्त केले.
ग्राहक मिळेना
रत्नागिरी, देवगडला माझी बाग आहे. आंब्याचा व्यापार लॉकडाउनमध्ये अडकला आहे. कोरोनामुळे ग्राहक भेटत नाहीत, अशी अवस्था आहे. ६० टक्के तोटा झाला आहे. आम्ही आमच्या ग्राहकापर्यंत आंबा पोहचवू शकलो नाही.- रुपेश देसाई, मांजरे, संगमेश्वर, रत्नागिरी
गेल्या काही दिवसांपासून म्हणजे मागील सात दिवस बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे काहीसा फटका बसला. पण एकदमच नुकसान झाले असे नाही. १०० टक्के फायदा नाही. जवळपास सत्तर टक्के व्यवसाय झाला.- तेजस मुळे, पावस, रत्नागिरी