मुंबई: योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं कोरोनावरील आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लाँच केलं होतं. कोरोनावर मात करण्यासाठी आयुर्वेदिक औषध प्रभावी आहे, असा दावा बाबा रामदेव यांनी केला होता. मात्र पतंजली कंपनीने या औषधाची योग्य ती माहिती न दिल्याने केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने योग्य तपासणी होईपर्यत कोरोनिल औषधाची जाहिरात न करण्याचे आदेश आयुष मंत्रालयाने दिले होते. आयुष मंत्रालयाच्या या निर्णयानंतर राज्य सरकारने देखील महाराष्ट्रात कोरोनिल औषधावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.
कोरोनिल औषधावर महाराष्ट्रात बंदी घालण्यात येत असल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घोषणा केल्यानंतर भाजपने पतंजलीचा बचाव करण्यास सुरुवात केली होती. कोणत्याही चाचणीशिवाय औषधावर बंदी घालणं चुकीचं आहे, असं मत भाजपाचे नेते राम कदम यांनी व्यक्त केलं होतं. तसेच देशभरातूनही भाजपाने रामदेव बाबांसाठी बॅटिंग करण्यास सुरुवात केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करत अनिल देशमुख यांनी पतंजली कंपनीला तंबीच दिली आहे.
पतंजली कंपनीने कोरोनिल हे औषध आणताना आयुष मंत्रालय किंवा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल सायन्सचीही परवानगी घेतली नाही. कोणतंही औषध बाजारात आणतांना संबंधित ऑथोरिटीकडून परवानगी घ्यायला हवी. पण पतंजलीने ही परवानगी घेतली नाही. त्यामुळे कोरोनिल औषधावर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. तसेच कोरोनिलची महाराष्ट्रात जाहिरात किंवा विक्री केल्यास पतंजलीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा देखील अनिल देशमुख यांनी दिला आहे. त्यामुळे पतंजलीसमोरच्या अडचणीत वाढ झाली आहे.
तत्पूर्वी, आयुष मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीने कोरोनावरील उपचारासाठी विकसित केलेल्या कोरोनिल औषधाची आम्ही दखल घेतली आहे. पतंजली कंपनीने या औषधाची योग्य ती माहिती द्यावी, असं आयुष मंत्रालयाने सांगितले आहे. तसेच पतंजलीने क्लिनिकल ट्रायल झाल्याचा दावा केला आहे. मात्र त्याचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत असं आयुष मंत्रालाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोरोनिल औषधाची योग्य ती तपासणी होईपर्यत या औषधामुळे कोरोना आजार बरा होतो, अशा आशयाची जाहिरात न करण्याचे आदेश देखील आयुष मंत्रालयाकडून पतांजलीला देण्यात आले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या-
CoronaVirus News: रामदेव बाबांच्या 'कोरोनिल' औषधावर ठाकरे सरकारने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
शरद पवारांवरील वादग्रस्त विधानानंतर रोहित पवारांचा पडळकरांना 'सॉलिड' सल्ला
"जरा तोंड सांभाळून बोललं तर बरं होईल"; राष्ट्रवादीचा पडळकरांना थेट इशारा
"भाजपा आमदारांच्या अंगावर गेलात तर..."; पडळकरांच्या विधानावरून वाद चिघळला
मोदींच्या महत्त्वाच्या मोहिमेत अमेरिकेची आडकाठी; 'टेक ऑफ'साठी घातल्या अटी