CoronaVirus News : होम आयसोलेशन सुरू ठेवावे; डॉ. दीपक सावंत यांची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 02:17 PM2021-05-28T14:17:45+5:302021-05-28T14:24:51+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी होम आयसोलेशन सुरू ठेवणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी लोकमतकडे व्यक्त केले.
मनोहर कुंभेजकर
मुंबई-महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी १८ जिल्ह्यात जिथे करोनाचा संसर्ग जास्त आहे अशा ठिकाणी होम क्वारंटाईन करू नये असे आदेश नुकतेच काढले आहेत. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी होम आयसोलेशन सुरू ठेवणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लोकमतकडे व्यक्त केले.
होम आयसोलेशन सुरू ठेवावे याचे समर्थन करतांना डॉ.दीपक सावंत म्हणाले की, होम क्वारंटाईन मध्ये क्वारंटाईन होण्यासाठी पुरेशी जागा घरातील इतर माणसे बाधित व्यक्तीच्या संपर्कात येणे किंवा बाधित व्यक्ती स्वतः नियम न पाळता समाजात मिसळणे खरं तर ग्रामीण भागाचा आणि अती दुर्गम ग्रामीण भागाचा विचार केला तर क्वारंटाईन सेंटर्स अतिशय हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहेत.
ग्रामीण रुग्णालय, मंदिराचे हॉल, लग्नाचे मंगल कार्यालय, शाळा, समाज हॉल अशा ठिकाणी बाधितांना क्वारंटाईन करावे लागले लागेल त्यासाठी बेडपासून सर्व व्यवस्था पंखा, लाईट, खाण्यापिण्याची सोय, औषधे. ऑक्सिजन लागत असल्यास त्याची सोय डॉक्टर, नर्सिंग स्टाफ अशा अनेक गोष्टी लागतात. तसेच म्युकोरमायकोसिसचा धोका असल्याने रुग्णांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून क्वारंटाईंन सेंटरमधील स्वच्छतेकडे जातीने लक्ष द्यावे लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
होम आयसोलेशन बंद करून कोविड सेंटर उभारल्यास रुग्णाच्या आणि पर्यायाने शासन प्रशासनाच्या अडचणीत भरच पडणार आहे. या सर्व गोष्टीची अंमलबजावणी करणे म्हणजे पुन्हा टेंडरिंग आले. त्याचबरोबर घरून डबा मागवल्या घरातील माणसे डबा देण्यासाठी हॉस्पिटल किंवा कोविड सेंटरला येणार त्यांना अटकाव कोण करणार. हॉस्पिटलमधून इन्फेक्शन गावात, वाडीत पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
घरीच विलगीकरणासाठी जागा असल्यास कोरोना रुग्णाला घरीच ठेवावे. बाधीत व्यक्तीने स्वतः नियम पाळून समाजात न मिसळणे हे महत्त्वाचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे रुग्णांना होम आयसोलेशनचा पर्याय दिल्यास अनेक प्रश्न उभे राहणार नाही. होम आयसोलेशनच्या अंमलबजावणीसाठी गावाची मॉनिटरिंग कमिटी असावी, यात रुग्ण सेवक, सरपंच, पोलीस पाटील यांची कमिटी ही आयसोलेटेड रुग्णांवर सर्वोतोपरी लक्ष ठेवून कोरोनाचा संसर्ग घरातील व गावातील नागरिकांना होणार नाही आणि ते कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहतील असा विश्वास डॉ. दीपक सावंत यांनी शेवटी व्यक्त केला.