मुंबई - होम क्वारंटाईन असलेले कोरोना बाधित रुग्ण अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळून आले आहे. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने महापालिका प्रशासनाने आता कडक नियम लागू केले आहेत. त्यानुसार कोरोना बाधित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांनाही लेखी हमी व त्यांच्या फॅमिली डॉक्टरशी चर्चा केल्यानंतरच त्यांना होम क्वारंटाईन होण्याची परवानगी दिली जाणार आहे. (CoronaVirus News: Home quarantine only after written guarantee; Revised Circular of Municipal Administration)
कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यात लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ८० टक्के आहे. या रुग्णांना होम क्वारंटाईन होण्याची परवानगी महापालिकेने दिली आहे. परंतु, नियमानुसार १४ दिवस घरातच रहाण्याऐवजी काही रुग्ण बाहेर फिरत असल्याचे समोर आले आहे. अशा काही रुग्णांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेने आता सुधारित नियमावली आणली आहे.
त्यानुसार कोरोना बाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर त्याच दिवशी होम क्वारंटाइनची प्रक्रिया संबधित विभाग कार्यालयाने पूर्ण करावी. तसेच वॉर रुममार्फत रुग्णांची नियमित विचारपूस करणेही बंधनकारक असेल. त्याच बरोबर प्रत्येक विभागातील समर्पित वैद्यकिय पथकाने होम क्वारंटाइन असलेल्या किमान दहा टक्के व्यक्तींच्या घरी रोज भेट देणे आवश्यक करण्यात आले आहे.
फॅमिली डॉक्टरशी चर्चा करणार...लक्षणविरहित, सौम्य लक्षणं असलेले, सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणं नसल्यास त्यांना होम क्वारंटाइनची परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी वैद्यकिय पथक संबधित रुग्णाच्या फॅमेली डॉक्टरशी चर्चा करुन निर्णय घेणार आहे. तसेच स्वतंत्र खोली आणि स्वतंत्र शौचालय असणे बंधनकारक आहे. मास्क आणि ग्लोव्हज वापरणे, ऑक्सीमिटरच्या मदतीने दैनंदिन तपासणी करुन त्यांची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अन्यथा कारवाई...होम क्वारंटाइनचे नियम मोडणाऱ्या रुग्णांना कोविड केंद्रात पाठविण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई देखील करण्यात येईल.
यांच्यावर विशेष लक्षज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असलेल्या बाधित रुग्णांमध्ये आठवडाभराने कोविडची लक्षणं दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा व्यक्तींच्या घरी जाऊन पडताळणी करण्याची जबाबदारही पालिकेच्या वैद्यकिय पथकावर सोपविण्यात आली आहे. प्रसुती कालावधी दोन आठवड्यावर असलेल्या गर्भवती महिलांना घरी राहता येणार नाही.