CoronaVirus News : परदेशी प्रवासी निगेटिव्ह आल्यास सात दिवसांत घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 01:20 AM2020-12-25T01:20:31+5:302020-12-25T01:21:02+5:30
CoronaVirus News : मुख्य सचिव संजय कुमार यांनी या संदर्भातील सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या. आधीच्या सूचनांनुसार प्रवाशांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाइन राहणे अनिवार्य होते.
मुंबई : युरोप, दक्षिण आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील देशांमधून आलेल्या आणि कोरोना निगेटिव्ह असलेल्या प्रवाशांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाइन राहण्याची गरज नसेल. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना लगेच घरी जाता येईल.
मुख्य सचिव संजय कुमार यांनी या संदर्भातील सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या. आधीच्या सूचनांनुसार प्रवाशांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाइन राहणे अनिवार्य होते. त्यामुळे या प्रवाशांना ते पॉझिटिव्ह असले वा नसले तरी हॉटेलमध्ये १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागत होते. मात्र, आता प्रवासी महाराष्ट्रात आल्यानंतर पाचव्या ते सातव्या दिवशी त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि कोरोनाची लक्षणे नसली तरीही त्यांना हॉटेल वा कोविड हॉस्पिटलमध्ये संस्थात्मक क्वारंटाइन राहावे लागेल. मात्र, अहवाल निगेटिव्ह आला तर घरी जाता येईल, पण घरी आणखी सात दिवस क्वारंटाइन राहावेच लागेल.
‘त्या’ प्रवाशांचीदेखील होणार चाचणी
- केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
- विमानतळ अधिकाऱ्यांकडून २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांची यादी प्राप्त झाली असून ही यादी प्रत्येक जिल्हा व महापालिकेला पाठविण्यात आली आहे. संबंधित यंत्रणा प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी करतील.