CoronaVirus News: कोरोनाबाधितांचा मृत्युदर वाढल्याने रुग्णालयांची शवागृहे भरली; रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 02:32 AM2020-05-27T02:32:12+5:302020-05-27T06:39:51+5:30
केईएम रुग्णालयात मृतदेह कॉरिडॉरमध्ये;
मुंबई : मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येने हजाराचा आकडा पार केला आहे. शहरातील रुग्णालयातील खाटा अपुऱ्या पडत आहेत. सोबतच आता मृतांची संख्या वाढत असल्याने शवागृहेही भरली आहेत. केईएम रुग्णालयातील शवागृह भरल्याने रुग्णालय प्रशासनाला मृतदेह कॉरिडॉरमध्ये ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अन्य रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मृतदेह ठेवण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कॉरिडॉरचा फोटो सोमवारी सकाळपासूनच सोशल मीडियावर व्हायरल होत असून इतर रुग्णालयांत याहूनही अधिक विदारक परिस्थिती असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी असणारी यंत्रणा, नातेवाइकांकडून मृतदेह ताब्यात घेण्यास लागणारा वेळ यामुळे शवागृहांच्या यंत्रणेवरही ताण येत असल्याने हे चित्र पाहायला मिळत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने परळ येथील केईएमसारख्या महत्त्वाच्या रुग्णालयातील ताण निश्चित वाढला आहे.
केईएम रुग्णालयाच्या शवागृहात २७ मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. तर रुग्णालयात सध्या एकूण ३७ मृतदेह आहेत. त्यामुळे १० मृतदेह कॉरिडॉरमध्ये ठेवण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांत शवागृहातील सात कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.शवागृहात कर्मचाºयांची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. शवागृहातील जागा कमी, रुग्णालयात कर्मचारी कमी या कात्रीत प्रशासन सापडल्याचे चित्र आहे.
कोरोनाबाधित मृतदेहांची हेळसांड होऊ नये, त्वरित विल्हेवाट लावता यावी यासाठी पालिका प्रशासनाने एक समिती नियुक्त करून नवीन नियमावली तयार केली आहे. तरीही मृतांच्या कुटुंंबाकडून वेळेत प्रतिसाद न मिळणे, पोलीस पंचनाम्याला उशीर होणे, दहनभूमीमधील गर्दी यामुळे बºयाचदा मृतदेह रुग्णालयातच बराच वेळ ठेवावे लागतात. यामुळे मृतदेह पडून राहण्याच्या घटना वाढत आहेत.
सायन आणि केईएम रुग्णालयात कोरोनाच्या मृतदेहांच्या बाजूला रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे व्हिडीओ यापूर्वी व्हायरल झाले होते. याची गंभीर दखल घेत पालिका प्रशासनाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांसाठी वेगळी सोय करावी, असे आदेश सर्व रुग्णालयांना दिले. परंतु, पालिका प्रशासनाच्या आदेशानंतरही केईएम रुग्णालयात कोरोनाचे मृतदेह शवागृहाच्या मोकळ्या जागेत ठेवले जात असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
मृतदेहावर अर्ध्या तासात अंत्यसंस्कार
सरकारी रूग्णालयात कोरोनाबाधित मृतदेहांची समस्या सोडविण्यासाठी आता विशेष कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय, केवळ मृतदेहांच्या व्यवस्थेसाठी चतुर्थ श्रेणी कामगारांची भरतीही करण्यात आली आहे. त्यानुसार आता अर्ध्या तासात संबंधित रूग्णालयातील मृतदेह बंदिस्त करून अर्ध्या तासात मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे शक्य होणार आहे. भरती आणि निश्चित कार्यप्रणालीमुळे यापुढे मृतदेहांबाबतच्या तक्रारी संपतील, असे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले. मंगळवारी घेण्यात आलेल्या आॅनलाइन पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.