CoronaVirus News: अनुयायी आल्यास त्यांची कोविड चाचणी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 02:16 AM2021-04-10T02:16:47+5:302021-04-10T02:17:06+5:30
चैत्यभूमीचे बुधवारी थेट प्रक्षेपण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय मानवंदना कार्यक्रमाचे ऑनलाईन व प्रसारमाध्यमांच्या साहाय्याने थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे अनुयायांनी आपापल्या घरी राहून अभिवादन करावे. प्रत्यक्ष चैत्यभूमीवर येणे टाळावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. चैत्यभूमीवर दर्शनासाठी येणाऱ्या अनुयायांची चाचणी करण्यात येणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने १४ एप्रिल रोजी दादर, चैत्यभूमी स्मारक येथे करण्यात आलेल्या पूर्वतयारीची अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी पाहणी केली. चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. यासाठी येथे वेगवेगळ्या सुविधांची कामे केली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती, दिवाबत्ती यांचा समावेश असतो. यंदाच्या १३०व्या जयंती दिनाच्या पार्श्वभूमीवर ही सर्व कामे सध्या सुरु आहेत. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा विशेष व्यवस्थेसह आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.
संसर्गाचा धोका
संसर्गाचा धोका पुन्हा वाढला असल्याने पालिका सतर्क आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून एकत्र येण्यावर असलेल्या निर्बंधांचे पालन करणेदेखील गरजेचे आहे. त्यामुळे यंदा शासकीय मानवंदना कार्यक्रमाचे ऑनलाईन. प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने थेट प्रक्षेपण होणार आहे. प्रत्यक्ष चैत्यभूमी येथे न येण्याचे आव्हान केले आहे.
कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून एकत्र येण्यावर असलेल्या निर्बंधांचे पालन करणेदेखील तितकेच गरजेचे आहे. शासकीय मानवंदना कार्यक्रमाचे ऑनलाईन व प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.