CoronaVirus News : सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होणारी लॉकडाऊनची 'ही' नियमावली खोटी, पालिकेने केलं स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 07:30 PM2021-04-30T19:30:48+5:302021-04-30T19:33:21+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी तो मेसेज खोटा असल्याचे स्पष्ट करीत मुंबईकरांमधील गैरसमज दूर केला.
मुंबई - राज्यात १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन कायम राहणार आहे. असा निर्णय राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर या काळातील नियमावली व कोणती दुकानं कोणत्या वेळेत सुरू राहतील याची माहिती देणारा तक्ता शुक्रवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत होता. अखेर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी तो मेसेज खोटा असल्याचे स्पष्ट करीत मुंबईकरांमधील गैरसमज दूर केला.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने २३ एप्रिलपासून लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाऊनची कालावधी १ मे रोजी संपणार होती. मात्र यामध्ये पुन्हा वाढ करीत १५ मे पर्यंत कडक निर्बंध कायम असणार आहेत. मात्र या काळात मुंबईतील किराणामालाची दुकाने, कपडे व चप्पलांची दुकाने, घाऊक भाज्यांची बाजारपेठ आदी दुकाने सुरू ठेवण्याची वेळ दर्शविणारा तक्ता शुक्रवारी सकाळपासून सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागला.
समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेली ही माहिती खोटी असून बृ.म.न.पा.ने असे कुठलेही नियम जाहीर केलेले नाहीत.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 30, 2021
राज्य शासनाने यापूर्वी जाहीर केलेली मार्गदर्शक तत्त्वेच लागू आहेत, याची कृपया नोंद घ्यावी.
कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका व त्या पसरवूही नका.#NoToFakeNewspic.twitter.com/bXii8JYXEx
महापालिकेचा लोगो आणि नवीन नियमावलीनुसार ही वेळ निश्चित करण्यात आल्याचे या मेसेजद्वारे भासवण्यात आले होते. त्यामुळे मुंबईकरांमध्ये गैरसमज वाढू लागला. अखेर पालिका प्रशासनाने आपल्या ट्विटर हॅण्डलद्वारे ही माहिती खोटी असल्याचे स्पष्ट केले. राज्य सरकारने जाहीर केलेली नियमावलीच यापुढे कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व शहानिशा केल्याशिवाय अन्य लोकांना असे मेसेज पाठवू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.