मुंबई : कोरोनाचा प्रसार मुंबईत वाढत असला तरी एका दिवसात सातशे इमारती प्रतिबंधमुक्त करण्यात आल्या आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने पाच बाधित रुग्ण सापडले तरी संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यामुळे गेल्या आठवड्यात सील इमारतींची संख्या १३०५ वर पोहोचली होती. मात्र गेल्या दोन दिवसांत यामध्ये पुन्हा घट दिसून येत आहे.
यापूर्वी १० बाधित रुग्ण सापडल्यानंतर इमारत सील करण्यात येत होती. मात्र त्यात बदल करून पाच बाधित रुग्ण आढळल्यास इमारत सील करण्यात येऊ लागल्या. त्यामुळे आठवडाभरापूर्वी सील इमारतींची संख्या वाढली होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून एक हजारांवर रुग्ण नोंदवले जात असताना सील इमारतींची संख्या झपाट्याने कमी झाल्याचे दिसून येत आहे.
बुधवारी ८१५ सील इमारतींची संख्या २५ फेब्रुवारीला थेट १२६ वर तर शुक्रवारी १२० पर्यंत खाली आली आहे. दरम्यान, चाळी-झोपडपट्ट्यांमधील बाधित क्षेत्रांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. २४ फेब्रुवारीला ५१ असणारे बाधित क्षेत्र शुक्रवारी रोजी १३ वर आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.