CoronaVirus News: पेडर रोड, मलबार हिलमध्ये रुग्णांमध्ये वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 02:20 AM2020-08-15T02:20:16+5:302020-08-15T02:20:32+5:30
उच्चभ्रू वस्तीत विळखा : महापालिकेसमोरील आव्हान वाढले, दैनंदिन संसर्गाचा दर मुंबईत कमी
मुंबई : दक्षिण मुंबईतील सर्व हॉटस्पॉट परिसरात रुग्णसंख्या आटोक्यात आली असताना मलबार हिल, पेडर रोड (डी विभाग) या उच्चभ्रू वस्तीत मात्र संख्या वाढताना दिसत आहे. मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढीचा सरासरी दर ०.८३ टक्के असताना या विभागात मात्र सर्वाधिक १.३८ टक्के आहे. गेल्या काही दिवसांमध्ये येथे दररोज ७० ते ८० रुग्ण आढळून येत आहेत.
मार्च महिन्यापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर वरळी, धारावी, वडाळा, सायन या विभागांमध्ये रुग्णसंख्या अधिक असल्याचे दिसून आले. या काळात कुलाबा, मलबार हिल, पेडर रोड अशा उच्चभ्रू वस्तीमध्ये रुग्णसंख्या कमी होती. मात्र दक्षिण मुंबईतील हॉटस्पॉट कोरोनामुक्त झाल्यानंतर आता डी विभागातील रुग्णवाढ नियंत्रणात आणणे पालिकेसाठी आव्हान ठरत आहे.
लॉकडाऊनच्या काळात प्रभावी उपाययोजनेनंतर या विभागात रुग्णसंख्या नियंत्रणात आली होती. मात्र ६ ते १३ आॅगस्ट या कालावधीत ४७५ रुग्ण वाढले आहेत. पूर्ण कुटुंब कोरोनाबाधित असण्याचे प्रमाण यामध्ये अधिक असल्याने चिंता व्यक्त होत आहे. तसेच पाच पोलीस आणि चार पालिका कर्मचाऱ्यांनाही लागण झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या पुन्हा नियंत्रणात आणण्यासाठी डी विभाग कार्यालयाची येथे धावपळ सुरू आहे.
आॅगस्ट महिना
तारीख रुग्ण
७ ३२
८ ७९
९ ६९
१० ६२
११ ७१
१२ ८७
१३ ७५
मुंबईत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी ८७ दिवसांवर पोहोचला आहे. डी विभागात हे प्रमाण ५० दिवस आहे.
मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढीचा सरासरी दर ०.८३ टक्के आहे. तर विभागात दैनंदिन रुग्णवाढीचा दर सर्वाधिक म्हणजे १.३८ टक्के आहे.
पाचशे खाटांची क्षमता असणाºया कोरोना केअर सेंटर (सीसीसी) - १ मध्ये सध्या २४० रुग्ण क्वारंटाइन आहेत. १४५ क्षमता असणाºया सीसीसी-२मध्ये सध्या ४७ जणांवर उपचार सुरू आहेत.