CoronaVirus News: रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्यात वाढ; २० रुग्णालय व कोरोना केंद्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 01:30 AM2020-06-19T01:30:58+5:302020-06-19T01:31:09+5:30
दोन लाख आठ हजार लीटर पुरवठ्याची क्षमता
मुंबई : रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या अधिक असली तरी तेवढ्या प्रमाणात आॅक्सिजन पुरवठा करण्याची क्षमता नव्हती. मात्र ही गैरसोय दूर करण्यासाठी महापालिकेमार्फत आता सहा मोठी रुग्णालये व १४ जम्बो कोरोना उपचार केंद्रांमध्ये आॅक्सिजन पुरवठा करण्याची क्षमता वाढविण्यात येत आहे. एकूण २० ठिकाणी दोन लाख आठ हजार लीटर आॅक्सिजन पुरवठ्याची क्षमता निर्माण करण्यात येणार आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली तसे पालिकेने रुग्णालयातील खाटा वाढविल्या. रुग्णाला श्वसनाचा त्रास जाणवल्यास आॅक्सिजनची गरज पडते. मात्र सध्या उपलब्ध आॅक्सिजन पुरवठा यंत्रणेव्यतिरिक्त अतिरिक्त क्षमता विकसित करावी लागत होती. त्याच वेळी कोरोना उपचार केंद्रांमध्ये पूर्णत: नव्याने ही यंत्रणा कार्यान्वित करणे, असे दुहेरी आव्हान पालिकेपुढे होते. मात्र रुग्णालयातील खाटा वाढविताना आॅक्सिजन पुरवठ्याची सोय असलेल्या खाटांचा समावेश आता करण्यात येत आहे.
अशी उभारली यंत्रणा
१३ हजार किलोलीटर व सहा हजार किलोलीटर अशा दोन प्रकारातील आॅक्सिजनच्या टाक्या १४ ठिकाणी, तर इतर सहा रुग्णालयांमध्ये एक हजार लीटर क्षमतेच्या टाक्या लावण्याचे निश्चित करण्यात आले.
संबंधित परिसरांमध्ये योग्य जागेचा शोध घेणे, जागा निश्चित केल्यानंतर त्याचे आराखडे तयार करणे, प्रत्यक्ष ठिकाणी खोदकाम करणे, तिथे आरसीसी प्रकारचे बांधकाम करणे, या बांधकामाला मजबुती मिळेपर्यंतचा अवकाश देत असताना आॅक्सिजन वाहिनीची कामे करणे, त्यासाठी संयंत्रे व विद्युत यंत्रणा जोडणे, अशी प्रक्रिया पार पडली.
सुरक्षितता मानके पाळून आवश्यक परवानग्या प्राप्त करणे, प्रत्यक्ष आॅक्सिजन पुरवठादारांचा शोध घेऊन त्यांच्याकडून आवश्यक संख्येने टाक्या उपलब्ध करून देणे, या टाक्यांमध्ये आॅक्सिजन पुरवठा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे.
येथे होणार पुरवठा...
उपचार केंद्रांची नाव आॅक्सिजन क्षमता (टाक्या)
वरळी एनएससीआय डोम १३ हजार लीटर (१)
महालक्ष्मी रेसकोर्स १३ हजार लीटर (१)
दहिसर टोलनाका १३ हजार लीटर (१)
दहिसर बस आगार १३ हजार लीटर (१)
मुलुंड रिचर्डसन क्रूडास १३ हजार लीटर (२)
गोरेगाव नेस्को १३ हजार लीटर (२)
वांद्रे-कुर्ला संकुल (भाग १) १३ हजार लीटर (१)
वांद्रे-कुर्ला संकुल (भाग २) १३ हजार लीटर (१)
शीव (सायन) रुग्णालय ६ हजार लीटर (१)
कस्तुरबा ६ हजार लीटर (१)
नायर रुग्णालय १३ हजार लीटर (१) केईएम रुग्णालय १३ हजार लीटर (१)
राजावाडी रुग्णालय ६ हजार लीटर (१)
कांदिवली येथील रुग्णालय ६ हजार लीटर (१)
भगवती रुग्णालय १ हजार लीटर (२)
कुष्ठरोग उपचार रुग्णालय १ हजार लीटर (१)
धारावी नागरी आरोग्य केंद १ हजार लीटर (२)
गोवंडी शताब्दी रुग्णालय १ हजार लीटर (१)
कुर्ला भाभा रुग्णालय १ हजार लीटर (२)
कामाठीपुरा नेत्र रुग्णालय १ हजार लीटर (१)